कोल्हापूर - गतसाली आलेल्या महापुरामुळे कुंभार समाजाची प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. कर्ज काढून तयार केलेल्या गणेश मूर्ती देखील वाहून पाण्यात वाहून गेल्या होत्या. आजही तसाच तोटा सदर समाजातील गणेशमूर्ती व्यावसायिकांना सोसावा लगत आहे. कोरोनामुळे राज्य शासनाने कमी उंचीच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्याचा आदेश जारी केला आहे. आधीच मागील वर्षी तोटा झाला होता, त्यात याची भर पडली असून महापुरामुळे नुकसान सोसलेल्या कुंभार संमाजाकडे आता अधिक नुकसान सोसण्याची ताकद उरलेली नाही, अशी व्यथा गणेशमूर्तीकारांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना मांडली आहे.
जानेवारीपासून मोठ्या गणेश मूर्ती तयार करण्यासाठी लाखो रुपयांची कर्जे काढली आहेत. गणेश मूर्ती बनवण्याचे काम आता शेवटच्या टप्प्यात आले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा फटका सहन होण्यापलीकडचा आहे. त्यामुळे कमी उंचीच्या मूर्तीचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी कोल्हापूरातील कुंभार बांधवांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - कोरोनाचा कहर..! देशात 24 तासांत 28 हजारांहून अधिक नवे कोरोनाग्रस्त
गतसाली आलेल्या महापुराचा सर्वात मोठा फटका कोल्हापुरातील कुंभार समाजाला बसला होता. शहरातील बापट कॅम्प, शाहूपुरी कुंभार गल्ली वसाहतीत पाणी घुसल्याने लाखो गणेश मूर्ती पाण्यात भिजून खराब झाल्या होत्या. पंचनामे करून देखील शासनाकडून कुंभार समाजाला अद्याप पूर्णतः मदत मिळालेली नाही. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात गतसालचा तोटा भरून काढावा, यासाठी कुंभार समाजाने नोव्हेंबरपासूनच गणेश मूर्ती तयार करण्याचे काम हाती घेतले होते. अनेक मूर्तिककारांनी लाखो रुपयांचे कर्ज काढून जानेवारी महिन्यापासूनच सार्वजनिक तरुण मंडळाच्या मूर्ती तयार करण्याचे काम हाती घेतले. जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.
कोल्हापूर शहरातील विचार करण्यास झाला, तर जवळपास पाच हजार पेक्षा जास्त चार फूट पेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्ती तरुण मंडळांना प्रतिष्ठापनेसाठी हव्या असतात. या सर्वांचे काम आता अंतिम टप्प्यात असतानाच कोरोनाच्या संकटामुळे राज्य सरकारने चार फुटांपेक्षा जास्त उंचीची मूर्ती बसू नये, असा निर्णय घेतला. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे कुंभार समाज हवालदिल झाला आहे. लाखो रुपयांचा खर्च करून या गणेश मूर्ती तयार केल्या आहेत, आता त्याचे करायचे काय? असा सवाल या समाजबांधवांच्या पुढे पडला आहे.
हेही वाचा - राजकीय चाल..! शिवसेना-भाजपचे सरकार आम्हाला होऊ द्यायचे नव्हतं - शरद पवार
इतकेच नव्हे तर गेल्या पाच ते सात महिन्यांपासून अनेक कारागिर आणि कर्मचारी हे मूर्ती बनवण्याच्या कामात व्यस्त आहेत. त्यांचा पगार आता कोठून काढायचा, हा सवाल देखील त्यांच्यासमोर आता उभा राहिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. असे असले तरीही 4 फुटांपेक्षा कमी उंचीची मूर्ती बसवावी, हा निर्णय रद्द करावा आणि पूर्वीप्रमाणेच सार्वजनिक तरुण मंडळांना गणेश मूर्ती बसण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कुंभार समाजातील गणेशमूर्ती व्यावसायिकांनी केली आहे.