कोल्हापूर : कोल्हापुरच्या खासबाग मैदानात पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू आहे. ही स्पर्धा विविध मुद्द्यानी रोजच चर्चेत येत आहे. बुधवारी तर चक्क काही महिला थेट कुस्ती स्पर्धा सुरू असताना कार्यक्रम स्थळी पोहोचल्या. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी महिला आणि स्पर्धेचे आयोजक, पोलीस यांच्यात झटपट आणि बाचाबाचीही झाली. भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील लैंगिक आरोपांप्रकरणी दिल्लीत जंतर-मंतरवर कुस्तीगीरांचे आंदोलन सुरू आहे. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक आणि मानसिक शोषणाच्या आरोपांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांना घेरलेले आहे.
महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे बक्षीस वितरण : बृजभूषण यांना अटक केली जाणार नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा कुस्तीगीरांनी घेतला आहे. याच ब्रिजभूषण शरण सिंह यांचे फोटो असलेले फलक कोल्हापुरात झळकत आहेत. तर गुरुवारी कोल्हापुरातील खासबाग मैदानात सुरू असलेल्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे बक्षीस वितरण ही त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे कोल्हापुरातील काही सामजिक महिला आणि राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी थेट खासबाग मैदानात घुसून दीपाली सय्यद यांना या प्रकरणी जाब विचारणार होत्या. परंतु स्पर्धा सुरू असताना हा सुरू असलेला सगळा गोंधळ पाहून ही दीपाली सय्यद या महिलांकडे फिरकल्याच नाहीत.
लैंगिक छळाचे आरोप : एकंदरीतच वादात सापडलेली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोल्हापुरच्या कुस्ती परंपरेला गालबोट लावणारी ठरत आहे. कारण ह्या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रनसाठी येणाऱ्या व्यक्तीवर लैंगिक छळाचे आरोप आहे. यासाठी दिल्लीत गेल्या तीन दिवसांपासून महिला कुस्तीगीर ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटक होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा घेत आहेत. तर दुसरीकडे राजर्षी शाहू महाराजांच्या कुस्ती पंढरीत याच व्यक्तीला बोलावून कोल्हापूरचे पावित्र्य नष्ट करत आहेत, अशी संतप्त टीका या महिलांनी केली आहे.