कोल्हापूर - सांगली आणि कोल्हापूरमध्ये काही केल्याने पावसाचा जोर कमी होण्यास तयार नाही. पावसामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ६७ हजार हेक्टर जमिनीला पुराच्या पाण्याचा तडाखा बसला आहे. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापुरात पोहोचले आहेत. दुर्घटनेत मृत झालेल्यांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची तर ज्यांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे अशांना १० ते १५ हजारांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. तसेच आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले आहे.
जिल्ह्यातील २२३ गावे पुराच्या पाण्यामुळे बाधीत झाली आहेत. जिल्ह्यातील १८ गावांना पूर्णपणे पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. 60 बोटींच्या सहाय्याने कोल्हापूर जिल्ह्यात मदकार्य सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. पुराच्या पाण्यामुळे 67 हजार हेक्टर जमीन खराब झाली आहे.
सांगलीमध्ये पुराच्या पाण्याची भीषण स्थिती आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरले असून तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. बचावकार्यासाठी अजून काही टीम सांगलीला पाठवणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. क्षमता लक्षात न घेता माणसे बसवली होती, तसेच सांगलीतल्या ब्रह्मनाळ (तालुका पलूस जि. सांगली) येथे क्षमता लक्षात न घेता बोटीत माणसे बसवली होती. त्यामध्येच इंजिनमध्ये झाडाची फांदी अडकल्याने बोट उलटल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
पूरग्रस्तांना हवी ती सगळी मदत केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. वेळप्रसंगी मुंबईतून डॉक्टरांची टीम बोलावणार आहे. या घटनेबाबत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही आमच्याशी संपर्क केला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कोल्हापुरातल्या पूरस्थितीची पाहणी केली. त्यांच्यासोबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा होते. येथील शिवाजी पुलावर सुरुवातीला पंचगंगा नदीच्या पुराची पाहणी केली. यावेळी आंबेवाडी, चिखली या गावांमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी सुरू असलेल्या बचाव कार्याची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर स्थलांतरित केलेल्या नागरिकांची मुख्यमंत्र्यांनी विचारपूस केली.