कोल्हापूर - 100 वर्षापूर्वीची कोडोली गावातील 53 एकर जमीन लाटण्यास खतपाणी घालणाऱ्या पन्हाळ्याचे तत्कालीन प्रांताधिकारी अजय पवार व भूमीअभिलेख अधीक्षक सुनील नाळे यांना निलंबित करा, अशी मागणी येथील ख्रिस्ती समाजाने केली आहे. या मागणीसाठी आज (मंगळवारी) कोल्हापुरात ख्रिस्ती समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तसेच ही मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी ख्रिस्ती समाजाने दिला.
काय आहे प्रकरण -
पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे ख्रिस्ती समाजाची शंभर वर्षांपूर्वीची 53 एकर जमीन आहे. कोडोली येथील कोईमार ट्रस्ट यांच्या मालकीची ही जमीन आहे. दीपक गायकवाड या व्यक्तीने एका जमिनीवर पन्हाळ्याचे तत्कालीन प्रांताधिकारी अजय पवार आणि भूमीअभिलेख उपअधीक्षक सुनील नाळे यांना हाताशी धरून बेकायदेशीररित्या सातबारा उताऱ्यावर एका कंपनीच्या नावाची नोंद केली, असा आरोप ख्रिस्ती समाजाकडून केला जात होता. ही जमीन कोल्हापूर चर्च कौन्सिल यांच्या लीज डीडप्रमाणे वापरात आहे. तत्कालीन प्रांत यांनी कोईमार ट्रस्टच्या विरोधात दिलेल्या आदेशात अप्पर जिल्हाधिकारी यांनी अंतरिम स्थगिती दिली. असे असतानाही सातबाराच्या आधारे प्रॉपर्टी कार्डमध्ये फेरफार करून कंपनीचे नाव बेकायदेशीर नोंद केले. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कोल्हापूर चर्च कौन्सिल यांचे नाव नोंद झालेले असताना बेकायदेशीर तसेच अधिकार नसताना उपअधीक्षक भुमीअभिलेख पन्हाळा सुनील नाळे यांनी नाव कमी केले. यासोबतच सदरच्या मालमत्ता सामाजिक वापरासाठी असताना सत्ता प्रकारांमध्ये मागणी नसताना बदल केला.
हेही वाचा - अमेरिकेत ‘हायपरलूप’ची पहिली मानवी चाचणी यशस्वी; पुण्याच्या तनय मांजरेकरला प्रवासाची संधी
ख्रिस्ती समाजाच्या मागण्या -
- सरकारी अधिकाऱ्यांशी संगनमताने फेरफार करून जमीन लाटणाऱ्या दीपक गायकवाडवरही कायदेशीर कारवाई करावी.
- सातबारा उताऱ्यावर बेकायदेशीररित्या बोगस कंपनीचे नाव नोंद करणाऱ्या तत्कालीन प्रांताधिकारी पवार व नाळे यांना निलंबित करावे.
- ख्रिस्ती समाजाच्या जमिनी मूळ मालकांना परत कराव्या.
तर बेमुदत साखळी उपोषणात मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव सहभागी झाले.