कोल्हापूर - लॉकडाऊन काही अंशी शिथिल होताच कोल्हापुरात चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणाला वेग येणार आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या चित्रनगरीत लवकरच लाईट. . कॅमेरा. . अॅक्शन. . असा आवाज ऐकू येणार आहे. विशेष म्हणजे दोन कोटी रुपये खर्चून आणखी एका नव्या स्टुडिओची उभारणी करण्याच्या कामाला सुद्धा सुरुवात झाली आहे. पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट..
कोल्हापूरची चित्रनगरी तब्बल 78 एकरमध्ये विस्तारलेली आहे. सध्या कोरोना संसर्गामुळे देशभर सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये ही चित्रनगरी देखील बंद आहे. तब्बल दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ चित्रनगरी बंद आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर कोल्हापूरच्या चित्रनगरीत चित्रीकरण सुरू होणार हे निश्चित झाले आहे.
सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मुंबई-पुणे रेड झोनमध्ये आहेत. मुंबई-पुण्यामध्ये बहुतांश सर्वच चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण पार पडते. मात्र कोरोनामुळे हे सर्वच अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे चित्रपट आणि मालिकांच्या निर्मात्यांनी चित्रीकरण करण्यास कोल्हापूरच्या चित्रनगरीला पसंती दर्शवली आहे. शिवाय कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सुद्धा कोल्हापूरला चित्रपट निर्मितीचे केंद्र बनविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे कोल्हापुरात लवकरच लाईट कॅमेरा आणि अॅक्शन असा आवाज ऐकू येणार आहे.
यातच एक आनंदाची गोष्ट म्हणजे कोल्हापुरात सद्या दोन सेट चित्रीकरणासाठी पूर्णपणे तयार आहेत. त्या ठिकाणी चित्रीकरणही यापूर्वी झाले आहे. सध्या सरकारने दोन कोटी रुपयांचा निधी चित्रनगरीसाठी दिला आहे. हा सर्व निधी चित्रनगरीत तिसरा सेट उभा करण्यासाठी खर्च होणार आहे. तिसऱ्या सेटच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून लवकरच हे काम सुद्धा पूर्ण होणार आहे.
लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर चित्रनगरीतील तिसऱ्या टप्प्याच्या सेट उभारणीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरच चित्रनगरीत 'लाईट कॅमेरा अॅक्शन असा आवाज ऐकायला मिळणार आहे.