कोल्हापूर - धनंजय महाडिकांनी आमची मैत्री पाहिली. आता दुष्मनी पाहू नका, असा इशारा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. ते भुदरगड येथील जाहीर सभेत बोलत होते.
महाआघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांना मैत्रीपोटी चंद्रकांत पाटील छुप्या पद्धतीने मदत करतील असा संभ्रम जिल्ह्यात पसरला आहे. त्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. धनजंय महाडिकांचे चेले भाजपमध्ये आले आहेत. त्यांनी महाडिकांची चेले चपाटी सुरू केली आहे. त्यांना पक्षातून काढण्याची नोटीस काढू, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
मी ओबढ-धोबड दिसतो म्हणून मला काही समजत नाही, असे समजू नका. जाड भिंगाच्या काचेमधून माझ्या डोक्यात काय आणि डोळ्यात काय चालले याचा अंदाज कधीच कोणाला येणार नाही. एनडीए सरकार येणार आहे, हे शरद पवार यांनी कबूल केले आहे. पण पंतप्रधान मोदी होणार नसल्याचे म्हटले आहे. मग ते पंतप्रधान होणार का? असा त्यांनी पवारांना टोला लगावला.