कोल्हापूर - जिल्ह्यातील चंदगड आणि हातकणंगले नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा निकाल जाहीर झाला आहे. यात चंदगड नगरपरिषदेवर महाआघाडीची सत्ता आली तर हातकणंगलेमध्येही शिवसेनेने बाजी मारली आहे. चंदगडमध्ये महाआघाडीच्या प्राची कानेकर आणि हातकणंगलेमध्ये काँग्रेसच्या अरुण जानवेकर यांची नूतन नगराध्यक्षपदी निवड झाली आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सुरू असताना दुसरीकडे या नगरपरिषदेचा निकाल लागल्यावर जल्लोष करण्यात आला. चंदगड हे राज्यातील शेवटचे टोक तसेच दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाते. अनेक वर्षांपासून येथे ग्रामपंचायत होती. मात्र, नगरपंचायतीची स्थापना झाल्यावर पहिल्यांदा पंचवार्षिक निवडणूक लागली. रविवारी यासाठी मतदान घेण्यात आले. यानंतर सोमवारी निकाल जाहीर करण्यात आला. भाजप आणि महाआघाडीच्या या चुरशीत महाआघाडीच्या प्राची कानेकर यांनी बाजी मारली. तर भाजप उमेदवार समृद्धी काणेकर या पराभूत झाल्या. चंदगडमध्ये महाआघाडीने 10 जागा पटकावल्या. तर भाजपला 5 जागांवर समाधान मानावे लागले आहे. 2 अपक्ष उमेदवारही तिथे निवडून आले आहेत.
हेही वाचा - विरोधकांचे खोटे बोलून झाले, आता काम करु द्या - आदित्य ठाकरे
दुसरीकडे हातकणंगलेमध्ये 17 जागांसाठी मोठ्या चुरशीने मतदान झाले होते. यात शिवसेनेला सर्वाधिक म्हणजेच 7 जागा मिळवता आल्या आहेत. मात्र, काँग्रेसच्या अरुण जानवेकर या नगराध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. यात शिवसेनेने 7, भाजपने 5, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी 1 जागा मिळवली आहे. तसेच 3 अपक्ष नगरसेवकही या निवडणूकीत निवडून आले आहेत. हातकणंगलेमध्ये दोन्ही काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र होती. तर शिवसेना आणि भाजपने वेगवेगळी निवडणूक लढवली होती.
हेही वाचा - 'गरिबांविषयी कनव कालही होती अन् आजही आहे.. मंत्रीपदामुळे त्यांच्यासाठीच अधिक काम करेन'
जिल्ह्यात गटातटाचे राजकारण सर्वत्र पाहायला मिळते. पक्षापेक्षा व्यक्ती श्रेष्ठ ही देखील जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे. परिणामी, नव्या राजकीय फॉर्मुल्यामुळेच आज अनेक नगरसेवकांच्या अंगावर गुलाल पडला आहे.