कोल्हापुर - देशात लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आज देशभरात चक्काजाम आंदोलन होत आहे. कोल्हापुरातसुद्धा विविध संघटनांच्या माध्यमातून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलन सुरू होताच पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. कोल्हापूर शहरातील मुख्य चौक असलेल्या दाभोळकर कॉर्नर येथे हे आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा - स्वच्छतागृहाच्या भिंतींवर गड-किल्ल्यांचे चित्र; शिवभक्त आक्रमक
भविष्यात जीएसटी आणि आयकर भवनाला घेराव घालून सरकारची कोंडी करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. शिवाय सरकारला खुश करण्याच्या भानगडीत पडू नका, नाहीतर तुमचे तुणतुणे बंद पाडायला वेळ लागणार नाही, असा सल्लासुद्धा शेट्टींनी सेलिब्रिटींना दिला.
आम्हाला माहीत आहे, पोपटाचा जीव कशात आहे
राजू शेट्टी म्हणाले, गेल्या अडीच महिन्यांपासून दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, हे अन्यायकारी सरकार अद्याप आपल्या म्हणण्यावर ठाम आहे. मात्र, आज चक्का जामच्या माध्यमातून आम्ही सरकारला केवळ इशारा देत आहोत. आम्हाला माहीत आहे, पोपटाचा जीव कशात आहे. सरकारचे महसुलाचे मुख्य माध्यम म्हणजे जीएसटी भवन आणि त्याच जीएसटी भवनाला बेमुदत घेराव घालून सरकारचे उत्पन्नाचे साधनसुद्धा बंद पडल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचा इशारा शेट्टी यांनी दिला.
आम्हाला देशप्रेम शिकवू नका
केंद्र सरकारच्या काळ्या कायद्यांविरोधात गेल्या अडीच महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. शेतकरी थंडीची पर्वा न करता अजूनही त्या ठिकाणी ठाण मांडून आहेत. मात्र, केंद्र सरकारला अद्याप दया आलेली नाही. उलट शेतकऱ्यांनाच दहशतवादी आणि आतंकवादी म्हटले जात आहे. शेतकरी आणि शेतकऱ्यांची मुले आता या सरकारला आतंकवादी वाटू लागली आहेत. आमची मुले तिकडे सिमेवर देशाचे रक्षण करत आहेत आणि तुम्ही आम्हालाच आतंकवादी म्हणता? असा सवाल करत आम्हाला देशप्रेम शिकवू नका, असेही शेट्टी म्हणाले.
यावेळी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे नामदेव गावडे, उदय नारकर, सतीशचंद्र कांबळे, गिरीश फोंडे, रघुनाथ कांबळे, चंद्रकांत यादव, प्रशांत आंबी यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.
सरकारला खुश करायच्या भानगडीत पडू नका
अनेक सेलिब्रिटींनी सरकारच्या समर्थनार्थ ट्विट करत त्यांची बाजू घेतली आहे. यावर शेट्टींनी आक्रमक होऊन त्यांना सुद्धा खडे बोल सुनावत सल्ला दिला आहे. यावेळी ते म्हणाले, भलेही तुम्ही सरकारचे आश्रयदाते असाल, लाभधारक असाल म्हणून सरकारला खुश करण्याच्या भानगडीत पडू नये. आपल्या नावामागे सेलिब्रिटी नावाची शेपूट लागली आहे, ती केवळ या कोट्यवधी लोकांचे आपल्यावर प्रेम आहे म्हणून. आणि हे सर्वच कोट्यवधी नागरिक आता केंद्र सरकारने लादलेल्या कृषी कायद्यांविरोधात आहेत. त्यामुळे, तुम्ही या सर्वांच्या विरोधात जाऊन केंद्र सरकारच्या समर्थनात बोलू नका, नाहीतर एकदिवस तुमचे तुनतुने बंद पडायला वेळ लागणार नाही, असेही शेट्टी यांनी म्हटले.
नागपुरातही चक्काजाम आंदोलन
आज नागपुरात विविध सामाजिक आणि धार्मिक संघटनांकडून शहरातील इंदिरा चौक परिसरात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शीख आणि मुस्लिम धर्माचे नागरिक सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला अहंकार सोडून तीनही कृषी कायदे परत घेतल्यास देशात सुख-समृद्धीचे वातावरण परत नांदेल, असा विश्वास आंदोलकांनी व्यक्त केला.
हेही वाचा - राज्याला पंधराव्या वित्त आयोगातील 1,456 कोटी रुपयांचा निधी प्राप्त- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ