कोल्हापूर - राजर्षी शाहू महाराजांची जयंती आज मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरी होत आहे. बहूजन हिताय, बहुजन सुखाय या व्यापक उद्देशाची प्रजाहितदक्ष राजवट राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात राबवली होती. त्यामुळेच त्यांच्या या लोकोत्तर कार्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी संपूर्ण करवीर नगरी आज त्यांची जयंती मोठ्या आनंदाने साजरी करत आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज सकाळी राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळी त्यांच्या प्रतिमेला शासनाच्यावतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज पाटील, महापौर सरिता मोरे, जिल्हाधिकारी डॉ. दौलत देसाई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर ऐतिहासिक दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यात आला.
परंपरेप्रमाणे यंदाही कसबा बावड्यातील लक्ष्मी-विलास पॅलेस या राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळावर त्यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. त्यानंतर मंत्री पाटील मान्यवरांसह दसरा चौकात आले. तेथे हजारो विद्यार्थ्यांसह शाहूप्रेमींनी गर्दी केली होती. पोलिस बँडची खास करवीर रियासतची धून आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. यानंतर शोभायाचेत्रे उद्घाटन झाले. या शोभा यात्रेत लेझीम, झांज पथक, मर्दानी खेळ, शाहू महाराजांच्या जीवनावरील आधारित चित्ररथ, शाहू महाराजांच्या कार्याचे प्रबोधन करणारे फलक घेऊन हजारो विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झाले. दसरा चौकातून व्हीनस कॉर्नर, विल्सन पूल, आईसाहेबांचा पुतळा, बिंदू चौक, शिवाजी पुतळा, सीपीआर मार्गे शोभायात्रा पुन्हा दसरा चौकात येऊन विसर्जित झाली. या चित्ररथाबरोबरच काढण्यात आलेल्या समता रॅलीत शाहूच्या कार्याची माहिती देणारे फलक घेऊन शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.