कोल्हापूर - शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातून विनापरवाना कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळमध्ये आल्याने त्यांच्यावर कारवाई झाली.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा संचारबंदीचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिलेल्या आदेशानुसार 60 वर्षांवरील नागरिकांना जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी विनाकारण फिरता येणार नाही, अथवा कोणीही विनापरवाना जिल्ह्यात दाखल होणार नाही, असे आदेश दिले होते. असे असताना संभाजी भिड़े यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोणातून कोणतीही खबरदारी घेतली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी त्यांना सांगली रस्त्यावरील उदगाव टोल नाक्यावर रोखून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.