कोल्हापूर - शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी येथे देवीच्या पालखी मिरवणूकी समोर फटाके उडवण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. तर दोन्ही गटातील काही कार्यकर्त्यांनी नंग्या तलवारी आणि दहशत माजवण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा स्थानिकांमधून होत आहे. एकमेकांच्या अंगावर जात शिवीगाळ करून दगडफेक झाल्याने गावामध्ये सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीपासून या दोन गटांमध्ये वाद असल्याने हा प्रकार घडला असून या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी हस्तक्षेप करत 23 जणांना ताब्यात घेत गुन्हे दाखल केले आहेत.
फटाके वाजवण्याच्या कारणावरून राडा - मजरेवाडी येथील होळकर चौकात साहेब ग्रुप व सरकार प्रेमी असे दोन ग्रुप आहेत. ग्रामपंचायत निवडणुका झाल्यापासून या दोन्ही गटांमध्ये वाद चालू होता. दरम्यान काल गावात लक्ष्मी-देवीची यात्रा सुरू असताना रात्री अडीच वाजताच्या सुमारास देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी सरकार साहेब चौकात आल्यानंतर एका गटाने फटाके उडवत असताना दुसऱ्या गटाने फटाके उडवण्यास मज्जाव केला. दरम्यान दोन्ही गटांमध्ये वाद चिघळला आणि वादाचे शिवीगाळ व हाणामारीमध्ये रूपांतर झाले. या सर्व प्रकाराची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, अमित पाटील यांनी धाव घेत जमावास पांगवले. हा सर्व प्रकार पोलिसांसमोरच घडला असून पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना अटक केली आहे. यामुळे काल दिवसभर गावातील प्रमुख मंडळींनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. तसेच दोन्ही गटातील वाद मिटवण्याचा प्रयत्न सुरू होता. या दोन्ही गटाच्या राड्यामध्ये दोघेजण जखमी झाले असून दोघांवर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - IIM Nagpur : राष्ट्रपतींच्या हस्ते आयआयएमच्या भव्य इमारतीचे उद्घाटन
23 जणांविरोधात गुन्हा दाखल - हाणामारी केलेल्या सर्व कार्यकर्त्यांवर रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यात मजरेवाडी येथील किशोर बाळासाहेब जुगळे, संतोष सुधाकर चव्हाण, राजेंद्र मारुती गायकवाड, कुमार अण्णासाहेब पाटील, चिदानंद आप्पासाहेब पाटील, प्रथमेश शिवाजी खराडे, अमोल बाळासाहेब जुगळे, अभिषेक सदाशिव बदामे, रंजीत अरुण माळी, प्रशांत सदाशिव माळी, सुशांत सदाशिव माळी, किशोर सुधाकर चव्हाण, अजिंक्य दिनकर नरोटे, शेखर दत्तात्रय कागले, शेखर गणेश ढवळे, पवन अजय माळी, विनायक चंद्रकांत कारंडे, अभिजीत संजय इंगळे, विश्वजीत संजय इंगळे, सुरज आनंदा कागले, नरसु विठ्ठल गायकवाड, अमित दिनकर नरोटे, ऋतिक राजेंद्र कागले सर्वजण राहणार मजरेवाडी अशा 23 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.