कोल्हापूर - आरक्षण हे असाधारण स्थितीत 50 टक्क्यांच्या वरही देता येते. मात्र, ठाकरे सरकारला आरक्षणाचे गांभीर्यच नाही. त्यामुळेच आरक्षण रखडले असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. शिवाय गेल्या काही दिवसांपासून पोलीस उपनिरीक्षक सचिन वाझे यांच्या प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत असताना राज्यातील आणखी एक मंत्री राजीनामा देणार असल्याचा दावा त्यांनी केला. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी अनेक वर्षांचा संघर्ष करावा लागला आहे. शिवाय हा मराठा समाजाचा हक्क सुद्धा आहे. मात्र, आपल्याला मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवता येत नाही, हे दाखविण्यासाठीच ठाकरे सरकार आता केविलवाणी धडपड करत आहे. ते पुढे म्हणाले, अशोक चव्हाण हे थेट उच्च न्यायालयावर आक्षेप घेत आहेत. ज्या तीन मुद्द्यांच्या आधारे आरक्षण द्यायचे होते, त्यामध्ये मराठा समाज मागास आहे की नाही? मागास आहे तर 50 टक्क्यांच्या वर आरक्षण देता येते की नाही? शिवाय 102 व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याला आरक्षण देता येते की नाही? या तीनही गोष्टी उच्च न्यायालयाने मान्य केल्या आहेत. त्यामुळे त्यांनी थेट उच्च न्यायालयाचा अवमान केला असून त्यांच्यावर उच्च न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल झाली पाहिजे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
आणखी एक मंत्री राजीनामा देण्याची शक्यता
राज्यातील काही मंत्री दिल्लीमध्ये गेले आहेत. त्यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपें शिवाय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही नेत्यांचा समावेश आहे. काहीजण वर्षावर गेले आहेत. या सर्व घडामोडी पाहता आणखी एखादा मंत्री राजीनामा देण्याची शक्यता आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. ते पुढे म्हणाले, एका मंत्र्याने राजीनामा दिला आहे. दुसरा कधी राजीनामा देतोय या परिस्थितीत आहे आणि तिसरा राजीरामा आज उद्या होईल, असा दावासुद्धा चंद्रकांत पाटील यांनी केला.