कोल्हापूर - लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांसमोर सध्या आपण कोणते उपचार घेतले पाहिजेत, हा प्रश्न आहे. त्यामुळे, अशा रुग्णांच्या नातेवाईकांना भारतीय जनता पक्ष कोल्हापूरच्या वतीने भाजप कार्यालय बिंदू चौक येथे आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि आलोपॅथी औषधांचे मोफत कीट देण्याची सुरवात करण्यात आली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या सेवेची सुरुवात झाली.
हेही वाचा - कोल्हापुरात गुरुवारी तब्बल 53 जणांचा कोरोनाने मृत्यू; 1553 नवे रुग्ण
रुग्णालय व्यवस्थेवरचा ताण कमी होण्यास मदत मिळणार
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, कोरोनाची तीव्रता वाढत असताना त्याची लक्षणे देखील वेगवेगळी आहेत. बऱ्याच कोरोनाबाधितांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. लक्षणे नसताना आपण पॉझिटिव्ह आहोत यामुळे आपण कोणते उपचार घ्यावेत, यावर ते गोंधळून जात आहेत. सध्या या सर्वांना रुग्णालयात उपचार न घेता डॉक्टरांच्या सल्ल्याने गृहविलगीकरण करून उपचार करणे गरजेचे बनले आहे. यामुळे रुग्णालय व्यवस्थेवरचा ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे. भारतीय जनता पक्षाच्यावतीने या उपक्रमासाठी श्री. विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालयाचे आयुर्वेदिक व डॉ. मत्तीवाडे यांच्या होमिओपॅथी व अलोपॅथिक औषधांचे कीट देण्यात येत आहे.
10 तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांना व्हिडिओ कॉलद्वारे मार्गदर्शन करणार
औषधांसोबतच तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांना दिवसातून दोनवेळा व्हिडिओ कॉलमार्फत संपर्क करून उपचार आणि मार्गदर्शन करणार आहेत. रुग्ण बरा होईपर्यंत त्याला या औषधांचा पुरवठा करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून होम आयसोलेशनमध्ये सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती व त्याचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यानुसार आज भाजप कार्यालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना औषधांचे कीट देऊन ते कसे घ्यावे व कोण-कोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
हेही वाचा - मराठा समाजाचा संयम पाहिला, आता उद्रेक बघा; कोल्हापूरात मराठा समाजाचा इशारा