कोल्हापूर - शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून शाहू महाराजांचे जनक घराणे आता आक्रमक झाले आहे. स्वतः समरजितसिंह घाटगे यांनी जिल्ह्यात दौऱ्याला सुरुवात केली असून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्तांचे प्रश्न त्यांनी जाणून घेतले. 'शाहू जनक घराण्याची जनपंचयात' असे या दौऱ्याला नाव देण्यात आले आहे. पुढील सात आठवडे ते बळीराजाशी संवाद साधणार आहेत.
10 हजार कोटींची मदत तोकडी
परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानानंतर शासनाने 10 हजार कोटींची मदत जाहीर केली. मात्र ही मदत अतिशय तोकडी आहे. यामध्ये शासनाने अधिक मदत जाहीर करण्याची गरज असल्याची सुद्धा मागणी होत असल्याचे घाटगे म्हणाले.
खालील मुद्यांवर शेतकऱ्यांशी चर्चा
- शेतकरी कर्जमाफी - प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले होते. याला आता चार महिने उलटून गेले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सव्वा दोन लाखांपर्यंत आहे. पण हे सर्वजण या अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत. तसेच महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा अनेक शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही. याबाबत घाटगे सर्व शेतकऱ्यांकडून माहिती घेणार आहे.
- अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची त्वरित भरपाई मिळावी - अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. अशा सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून त्यांच्या खात्यावर भरपाई जमा करावी.
- लॉकडाऊन काळातील सर्व वीजबिल माफ करावे. तसेच विजदरवाढ सुद्धा मागे घ्यावी - लॉकडाऊन काळात व्यवसायासह रोजगार गेल्याने आधीच सर्वजण अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे, तसेच छुप्या पद्धतीने शासनाने विजेच्या दरांमध्ये भरमसाठ वाढ केली आहे, ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, याबाबत सुद्धा शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे.
- दूध दर वाढ मिळावी - गाईच्या दुधाच्या खरेदीत शासनाने कपात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दूध वाढीसह दुधाला अनुदान मिळावे, या मागणीसाठी अनेक आंदोलनं झाली. मात्र शासनाने आश्वासन देऊनही दूध व दूध पावडर अनुदानाची पूर्तता अद्याप केलेली नाही. पुन्हा गाईच्या दुधाच्या खरेदी दरात कपात केली आहे. त्यामुळे याकडे सुद्धा लक्ष वेधत समरजितसिंह घाटगे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.