कोल्हापूर - घटस्थापनेच्या मुहूर्तावर करवीर निवासिनी आई अंबाबाईचे मंदिर भाविकांसाठी उघडण्यात आले आहे. मात्र दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिरात नारळ, ओटी, हार आदी गोष्टी घेऊन जायला परवानगी नाही आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक संकटात असलेले विक्रेते आता आम्हाला दुकान सुरू करून सुद्धा काहीही उपयोग नसल्याचे म्हणत आहेत. नवरात्रोत्सव आमच्यासाठी महत्वाचा असतो. वर्षभर आमचे कुटुंब यावर चालत असते. मात्र भाविकांना मंदिरात कोणतीही वस्तू घेऊन जायला परवानगी नसल्याने आता आम्ही कसे जगायचे, असा सवाल प्रशासनाला केला आहे. पाहुयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांचा हा विशेष रिपोर्ट...
हिंदूंच्या परंपरा मोडीत काढण्याचा शासनाने काम केलं
मंदिर परिसरातील विक्रेते म्हणाले की, अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्यभरातील सर्वच धार्मिक स्थळे उघडण्यात आली. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर सुद्धा उघडण्यात आले. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात अत्यंत चांगल्या पद्धतीने भक्तांना दर्शन घेता यावे असे नियोजन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केले आहे. रांगेतून जाऊन सुद्धा भक्त अगदी 10 ते 15 मिनिटात दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडत आहेत. असे असताना मंदिरात मात्र नारळ, ओटी, हार, वेणी, हळदी-कुंकू आदी घेऊन जायला परवानगी नाही आहे. शिवाय चुकीच्या पद्धतीने अनेक ठिकाणी बॅरिकेटिंग केले आहे. त्यामुळे भक्तांना काहीही खरेदी करता येत नाहीये. जर मंदिरात हार, ओटी घेऊन जायला परवानगी नाही तर आम्ही दुकानं सुरू करून काय उपयोग, असा सवाल सुद्धा यावेळी विक्रेत्यांनी केला आहे. या सरकारने हिंदूंच्या परंपरा मोडीत काढण्याचे काम केले असल्याचे सुद्धा म्हटले आहे.
आमचा व्यवसाय बंद असेल तर कसे पोट चालवायचे?
मंदिरं सुरू होणार समजल्यावर आमचा आनंद द्विगुणित झाला होता. गेल्या अनेक दिवसांपासून आमचे व्यवसाय सुरू होते. मात्र मंदिर बंद असल्याने भाविक केवळ बाहेरूनच दर्शन घेत होते. आता मंदिर सुरू करून शासनाने सर्व भक्तांना दिलासा दिला होता. असे असताना भाविकांना मंदिरात हार, नारळ, ओटी, वेणी, पूजेचे साहित्य आदी काहीच घेऊन जायला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आम्ही आमचा उदरनिर्वाह कसा करायचा असा सवाल सुद्धा यावेळी विक्रेत्यांनी केला. शिवाय अनेक दिवसांपासून कोरोनामुळे आर्थिक संकटात आहे. त्यात आता मंदिरात काहीही घेऊन जायला परवानगी नसल्याने आम्ही अजूनही संकटात चाललो आहे. त्यामुळे आमचे पोट कसे चालवायचे असेही विक्रेत्यांनी म्हटले आहे.