कोल्हापूर : कोल्हापूर म्हटलं की विषय हार्डचं असतो. तुम्हाला याची अनेकदा अफलातून विषयांमधून प्रचिती आलीच असेल. आता एका निमंत्रण पत्रिकेची कोल्हापूरात चर्चा सुरू आहे. ती निमंत्रण पत्रिका काही साधी सुधी नसून चक्क चांदीची आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. कोल्हापूरातील एका सराफा व्यावसायिकाने (Bullion Trader) आपल्या दुकानात चक्क चांदीच्या निमंत्रण पत्रिका विक्रीसाठी ठेवल्या आहेत. चला तर मग पाहुयात याबाबतचा स्पेशल रिपोर्ट
चांदीची निमंत्रण पत्रिका : कोल्हापूरातील गुजरी येथील सोने-चांदीचे व्यापारी संदिप सांगावकर यांच्या दुकानात नेहमीच काही ना काही खास चांदीच्या वस्तू पाहायला मिळत असतात. त्यांनी याआधी सुद्धा चांदीचे मोठे मोदक, चांदीची चप्पल तसेच चांदीचा मास्क आदी बनवले होते. त्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत, कारण त्यांनी चक्क निमंत्रण पत्रिकाचं चांदीची बनवली आहे. ही चांदीची पत्रिका पाहायला आणि त्याची चौकशी करायला आता त्यांच्या दुकानात गर्दी होत आहे.
इतकी असेल किंमत आणि वजन : दरम्यान, या चांदीच्या पत्रिकीचे किंमत सुद्धा तब्बल 5 हजारांच्या आसपास असणार आहे. ही पत्रिका 60 ते 70 ग्रॅम चांदीची बनवली असून आजच्या दरानुसार साधारण 5 हजार रुपयेच्या आसपास एक पत्रिका असणार आहे. पत्रिकेची साईज साधारण 10-7 इंच इतकी असणार आहे. यामध्ये त्यांनी सुरुवातीला दोन वेगवेगळ्या डिझाईन बनवल्या आहेत.