कोल्हापूर - उघड्या परिसरात मद्यप्राशन करत असलेल्या पोलिसांना हटवणाऱ्या पोलीस उपअधीक्षकाला शिवीगाळ व धक्काबुक्की करण्याचा प्रकार कोल्हापुरात घडला आहे. याबाबत दोन पोलिसांसह अन्य एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा सर्व प्रकार कसबा बावडा परिसरात घडला आहे.
मध्यरात्रीच्या वेळी शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण हे दोन कर्मचाऱ्यांसह रात्र गस्तीवर होते. त्यावेळी कसबा बावडा येथील शंभर फुटी रोड परिसरात उघड्यावर महामार्ग विभागाच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यासह एकूण तिघेजण मद्यप्राशन करून दंगामस्ती करत होते. यावेळी शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, अंगरक्षक प्रविण पाटील यांनी त्यांना हटकले. मात्र मद्यधुंद अवस्थेतील महामार्ग च्या पोलीस कर्मचाऱ्यांनी उपअधीक्षक व पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घातला. पुढे हा वाद वाढत गेला. महामार्गच्या मद्यधुंद पोलिसांनी उपअधीक्षकाला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. संबधीत घडलेला प्रकार चव्हाण यांनी रात्रीच जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे यांच्या कानावर घालला. त्यानुसार अधीक्षक बलकवडे यांनी संबधीत महामार्गच्या पोलिसांसह एकूण तिघांवर कारवाईच्या सुचना दिल्या आहे. त्यानुसार उपअधीक्षक चव्हाण यांचे अंगरक्षक प्रविण प्रल्हाद पाटील याने दिलेल्या तक्रारीनुसार महामार्ग पोलीस कर्मचारी बळवंत शामराव पाटील, राजकुमार शंकर साळुंखे, यांच्यासह जितेंद्र अशोक देसाई यांच्यावर रविवारी सकाळी महाराष्ट्र दारू अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा-एनआयएकडून सचिन वाझेंना घेऊन मिठी नदीवर केली तपासणी; सीपीयू आणि डीव्हीआर केला जप्त
हेही वाचा-शरद पवार अन् अमित शाह भेट ही केवळ अफवाच, राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण