कोल्हापूर - देशात अंधश्रद्धाळू आणि बुआ-बाबा, तोंड बघून ज्योतिष सांगणाऱ्यांवर आपले आयुष्य सोपवणाऱ्यांची काही कमी नाही. अनेकजनांनी तर यावर लाखो रुपये खर्च केलेली उदाहरणे आपण पाहिली आहेत. मात्र, अशाच एका तोंड बघून ज्योतिष सांगणाऱ्या ज्योतिषाची संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी फिरकी घेतली. एव्हढेच नाही तर ज्योतिषाला स्वतःचेसुद्धा भविष्य समजत नाही हे त्याच्याकडून वधवून घेतले. हा संपूर्ण प्रकार त्यांनी आपल्या कॅमेरात कैद केला असून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
नेमकं काय घडले -
करवीर तालुक्यातील गिरगावात एक तोंड पाहून ज्योतिष सांगणारा ज्योतिषी आला होता. गावातील नागरिकांना त्यांचे भविष्य सांगत होता. हा संपूर्ण प्रकार संभाजी ब्रिगेडच्या रुपेश पाटील यांना समजला. ज्योतिष पुन्हा कोल्हापूरच्या दिशेने आपल्या सायकलवरून जात असताना त्याला रुपेश पाटील यांनी गाठले आणि त्याची चांगलीच फिरकी घेतली. तोंड बघून आपण नागरिकांचे भविष्य सांगू शकता, तर तुमचे स्वतःचे भविष्य सांगू शकता का? असे म्हटल्याने ज्योतिषाची बोलती बंद झाली. तीच तीच पाठ केलेली वाक्ये सांगून ज्योतिषावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना फसवता म्हणत, त्यांनी त्याला चांगलेच धारेवर धरले. शेवटी पोटासाठी हे करतो, असे म्हणत यापुढे हे बंद करतो म्हणत तिथून पळ काढला. हा संपूर्ण प्रकार रुपेश पाटील यांनी आपल्या कॅमेरात कैद केला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी याचे स्वागत केले आहे.