कोल्हापूर - शाहूवाडी तालुक्यातील कापशी येथील आरव केसरे या चिमुकल्याचा बळी नरबळीतून झाला नसल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासात सांगितले आहे. दरम्यान, आरवच्या हत्यामागे जवळचा नातेवाईक असल्याचा संशय पोलिसांना व्यक्त केला आहे. याबाबत योग्य दिशेने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
शाहूवाडी वारणा कापशी येथील सहा वर्षीय आरव केसरे याच्या खुनासंदर्भात पोलिसांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. शाहूवाडी तालुक्यातील कापशी येथे मंगळवारी पहाटे बेपत्ता झालेल्या आरवचा मृतदेह घराशेजारीच आढळून आला. आरवच्या मृतदेहावर हळद-कुंकू असल्याने ही हत्या नरबळीतून झाली असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र पोलिसांनी प्राथमिक तपासात हा नरबळी नसल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबतची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. शैलेश बलकवडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
हे ही वाचा - एनसीबीची कारवाई : पवई परिसरातून आणखी एका व्यक्तीला घेतले ताब्यात
प्राथमिक तपासात नरबळी सारखा कोणताही प्रकार दिसून येत नाही. पोलीस सर्व बाजूने तपास सुरू करत आहेत. असेही बलकवडे यांनी सांगितले. यापूर्वीच जिल्ह्यात काही घटनांमध्ये नरबळी दाखवण्याचा प्रयत्न गुन्हेगारांनी केला होता. अशा घटनांमध्ये तपास केला असता जवळचेच नातेवाईक त्यामध्ये असल्याचे तपासात उघड होत आहे. याप्रकरणात देखील आरवच्या खुनामागे जवळचेच नातेवाईक असल्याचा पोलिसांना संशय आहे.