कोल्हापूर : मागील आठवड्यातच जिल्ह्यातील एका जवानाला सीमेवर वीरमरण प्राप्त झाले होते. त्यानंतर आज कोल्हापुरातील आणखी एक सुपुत्र सीमेवर हुतात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे. संग्राम शिवाजी पाटील (37) असे या जवानाचे नाव असून, करवीर तालुक्यातील निगवे-खालसा गावचे ते रहिवासी होते. आज पहाटे काश्मीरच्या राजौरीमध्ये पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यांनी केलेल्या हल्ल्यात संग्राम यांना वीरमरण आल्याची माहिती मिळाली आहे.
संग्राम पाटील सैन्यदलात हवालदार पदावर कार्यरत होते. त्यांच्या पाठिमागे आई, वडील, भाऊ बहीण, पत्नी, दोन, मुले असा परिवार आहे. एकाच महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील जवान हुतात्मा झाल्याची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
पुढच्या महिन्यात संग्राम गावी येणार होते..
संग्राम पाटील यांची कुटुंबियांशी शेवटची भेट फेब्रुवारी महिन्यात झाली होती. त्यानंतर ते ड्युटीवर गेले होते. त्यानंतर ते परतले नव्हते. पुढच्या महिन्यात ते आपल्या गावी परतणार होते. याबाबत त्यांनी गावातील मित्रांना आणि भावांना फोनवरून माहिती दिली होती. मात्र पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात त्यांना वीरमरण आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
नवीन बांधलेले घर पाहायचं स्वप्न अधुरेच
संग्राम यांचे घराचे काम सुरू होते. फोनवरून माहिती घेऊन काम कुठपर्यंत आलं आहे याची ते माहिती घेत होते. मात्र शेवटी बांधलेलं घर पाहण्याचं राहूनच गेलं, अशी खंत त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.
कोल्हापूर जिल्ह्यात एकाच महिन्यातील दुसरी दुर्दैवी घटना..
नुकतेच पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूरातल्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावातले ऋषिकेश जोंधळे हे जवान झाले होते. त्यांनतर लगेचच संग्राम पाटील हे जवान शहीद झाल्याची माहिती मिळताच संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा : मोदीजी! बदला घ्या, शहीद जोंधळेच्या मित्रपरिवाराची आर्त हाक...