कोल्हापूर - अग्निशमन दलाची गाडी बोलावून सुद्धा नगरपरिषदेने उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जळालेला ऊस नगरपरिषदेतील अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आणून फेकत आपला निषेध व्यक्त केला आहे. मुरगुड नगरपरिषदेसमोर हे आंदोलन केले असून संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
रविवारी मुरगूडमधील दत्त मंदिर शेजारच्या काही शेतकऱ्यांचा तब्बल 30 एकरातील ऊसाला आग लागली होती. यामध्ये शेतकऱ्यांचे जवळपास 25 लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. मात्र आग लागली तेव्हा मुरगूड नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला आग विझविण्याबाबत फोन करण्यात आले तेव्हा अग्निशामक गाडी पंक्चर आहे, ड्रायव्हर जागेवर नाहीये, आधिकारी नाहीयेत अशी अनेक उडवाउडवीची कारणे सांगण्यात आली. त्यामुळे आज संतप्त शेतकऱ्यांनी कालच्या घटनेचा निषेध म्हणून जळालेला ऊस नगरपरिषदेच्या दारासह मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्या कार्यालयासमोर फेकून निषेध व्यक्त केला.
शेतकऱ्यांनी जळालेला ऊस फेकला नगरपालिका कार्यालयात इतर अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नांनी आग विझवली - मुरगूडमध्ये अग्निशमन दलाचा बंब असताना सुद्धा नगरपरिषदेकडून अनेक उडवाउडवीची कारणे देण्यात आली. मात्र, बिद्री साखर कारखाना, मंडलिक साखर कारखाना व कागल नगरपरिषदेच्या अग्निशामनने मात्र तब्बल 6 तासाच्या अथक परिश्रमातून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले आणि आग विझवली. त्यामुळे संतप्त शेतकरी मुरगुड नगरपरिषदेचा निषेध व्यक्त करत आहेत.
8 दिवसांपूर्वी सुद्धा अशीच घटना घडली होती -
आठ दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने एका शेतकऱ्याचा ऊस जळाला होता तेव्हा सुद्धा त्यांना अशाच पद्धतीचा अनुभव आला त्यानंतर त्या शेतकऱ्यांने बंब सुस्थितीत असावेत याबाबत मागणी सुद्धा केली होती. मात्र तरीही प्रशासनाने आपली चूक सुधारली नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.
बंबाच्या देखभालीवर वर्षाला 40 हजार रुपयांचा खर्च -
मुरगुड नगरपरिषद आपल्याकडील अग्निशमन बंबाच्या देखभालीवर तब्बल 40 हजार रुपये वर्षाला खर्च करते. मात्र तरीही नगरपरिषदेकडून अशा प्रकारे उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने नागरिकांमधून सुद्धा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
पाठपुरावा सुरू आहे; लवकरच बंबाची दुरुस्ती करून घेऊ - मुख्याधिकारी
आजपर्यंत अशाप्रकारच्या घटना घडल्यानंतर तात्काळ सेवा देण्यात आली आहे. मात्र गेल्या 15 दिवसांपासून बंबाचे इंजिन बंद आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिक पातळीवर चौकशी केली. शिवाय कोल्हापूर शहरात सुद्धा चौकशी केली, मात्र दुरुस्ती होत नाही. ज्या ठिकाणी याची बांधणी झाली आहे त्या ठिकाणी न्यावे लागणार आहे. याची बांधणी सोलापूरमध्ये झाली होती. त्यामुळे लवकरच याची दुरुस्ती करून नागरिकांच्या सेवेमध्ये ठेवणार असल्याचे मुरगुडचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी ईटीव्ही भारतला माहिती दिली.