कोल्हापूर : कोल्हापूर दौऱ्यात अमित शाह ज्या-ज्या परिसरामध्ये कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. त्या परिसरातील नागरिकांना उद्या घराबाहेर पडायचे असेल तर त्यासंबंधी माहिती पोलिसांना द्यावी लागणार आहे. एवढेच काय तर आधार कार्ड झेरॉक्स सुद्धा पोलीस ठाण्यात जाऊन जमा करावे लागणार आहेत. विनाकारण घराबाहेर पडता येणार नाहीये. त्याबाबतचा आदेशच कोल्हापूर पोलिसांनी काढला आहे.
काय म्हंटले आहे आदेशात : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ज्या ज्या कार्यक्रम ठिकाणी उपस्थिती लावणार आहेत, त्या परिसरातील नागरिकांना पोलिसांकडून आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, असे या आदेशात म्हटले असून बाहेर पडायचे असेल तर पोलीस ठाण्यामध्ये आधार कार्ड जमा करावे लागणार आहे. शिवाय कार्यक्रम परिसरात वाहनांचा सुद्धा वापर करता येणार नाहीये. अनेकांना याबातचे पत्र पोलिसांनी दिले आहे.
ड्रोनव्दारे चित्रीकरणास बंदी : दरम्यान, जिल्ह्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दौ-या निमित्त उपस्थित राहणार असल्याने व विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याने सर्व मान्यवरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी सी.आर.पी.सी. 1973 चे कलम 144 नुसार शनिवार 18 फेब्रुवारी आणि 19 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत कोल्हापूर विमानतळ परिसर व संपूर्ण शहरात ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास ड्रोन व्दारे चित्रिकरणास बंदी घातली आहे. केंद्रीय गृह मंत्री यांचा 19 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हा दौरा असून दौ-या दरम्यान जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
विविध कार्यक्रमांचे आयोजन : या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे देखील उपस्थित राहणार असून केंद्रीय गृहमंत्री यांना झेड प्लस सुरक्षेसह एएसएल वर्गवारी आहे. केंद्रीय गृहमंत्री जिल्हा दौरा कालावधीत 1) कोल्हापूर विमानतळ 2) पंचशिल हॉटेल 3) महालक्ष्मी मंदीर 4) एस.एम लोहिया हायस्कूल 5) नागाळा पार्क येथे सभा 6) छत्रपती शाहू महाराज पुतळा, दसरा चौक 7) छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, शिवाजी चौक 8) हॉटेल पॅव्हेलियन या ठिकाणी जाणार असल्याने संरक्षित व्यक्ती यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विमानतळ परीसर व संपूर्ण शहरात ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास प्रतिबंद घालणे आवश्यक असल्याचे म्हणत आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
हेही वाचा : Amit Shah Nagpur Visit : अमित शाह यांची नागपूरच्या दीक्षाभूमीला भेट