कोल्हापूर - जिल्ह्यात महापुराचा सर्वात जास्त तडाखा आंबेवाडी आणि चिखलीला बसला आहे. येथील पूरस्थिती भयंकर असून ठिक-ठिकाणी पाणी शिरले आहे. नदीकाठच्या अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. विशेषत: दोन्ही गावात पाण्याने 10 ते 12 फुटांची पातळी गाठली आहे. जाणून घ्या आंबेवाडीची सद्यपरिस्थिती ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीकडून...
संततधार पावसामुळे दोन्ही गावात मोठ्या प्रमाणात नागरिक अडकून पडले आहेत. नागरिकांना वाचवण्यासाठी एनडीआरएफचे जवान कार्यरत आहेत. कालपासून (बुधवार) जवानांनी पुरात अडकलेल्या नागरिकांसाठी बचावकार्य सुरू केले आहे. आज (गुरुवार) बचावकार्याला गती मिळाली असून नागरिकांना जलदगतीने सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम सुरू आहे. एनडीआरएफसोबत भारतीय सैन्याच्या जवानांकडूनही बचावकार्य सुरू आहे. गेल्या ४ दिवसांत जवळपास १ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहचवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंचगंगा नदीने ५४ फुटाची पाणीपातळी ओलांडली आहे. त्यामुळे, पूरस्थिती अद्यापही कायम आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर, अजूनही बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग पाण्याखाली गेला आहे. रस्ताचे रुपांतर नदीत झाले असून यावरुनच एनडीआरएफचे जवान बचावकार्यासाठी बोटीने जात आहेत.
हातकणंगले, शिराळा तालुक्यातही पुराची स्थिती गंभीर आहे. वारणा,कृष्णा नदीला महापूर आल्याने या नंद्यांच्या काठावरील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. पूरबाधित गावातील लोकांना, जनावरांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पुरामुळे वारणा काठच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.