कोल्हापूर - बुधवारी (5 ऑगस्ट) अयोध्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. या सोहळ्यामध्ये आपण प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत नाही. मात्र, सर्वधर्मीय नागरिकांनी आपल्या घरी गुढ्या उभारून सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष व शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी केले आहे.
ते कोल्हापूरात बोलत होते. या सोहळ्यामध्ये सर्वांनी एक होऊन सहभागी व्हावे. तसेच दारांमध्ये रांगोळी काढावी. घरोघरी राम नामजप आणि श्रीराम स्त्रोत्रचे पठण करावे. सायंकाळी अंगणामध्ये पणत्या प्रज्वलित कराव्यात, असे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले.
यावेळी ते म्हणाले, अयोध्या येथील राम मंदिराचे काम गेली कित्येक वर्षे रेंगाळलेले आहे. तेथे राम मंदिर साकारणे हे केवळ हिंदू धर्मियांचे नव्हे तर सर्व धर्मियांचे स्वप्न होते. सर्व धर्मियांसाठी हा अमृत क्षण ठरणार आहे. हा सोहळा कोरोना पार्श्वभूमीवर मर्यादित साधुसंत, मुनीजण, अतिथी यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. आपण या सोहळ्यामध्ये पवित्र आयोध्यानगरी येथे जाऊन प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत नाही. म्हणून त्याच श्रद्धेने हा दिवस साजरा करावा, असेही ते म्हणाले.