कोल्हापूर - येथील सर्वात जुने आणि हजारो चित्रपटांचा साक्षीदार असणारा जयप्रभा स्टुडिओची ( Jayprabha Studio ) विक्री झाल्याची माहीती समोर आली आहे. ज्या कोल्हापूरकरांनी लता मंगेशकर यांच्याविरोधात जाऊन जागा विक्री विरोधात लढा दिला होता. त्याच कोल्हापूरकरांच्या डोळ्यात धूळ फेकत ही जागा दोन वर्षांपूर्वीच विक्री झाल्याचे उघड झाले आहे. या जयप्रभा स्टुडिओसाठी रविवारपासून (दि. 13 फेब्रुवारी) जयप्रभा स्टुडिओसमोर आंदोलन करणार असल्याचे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी सांगितले.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची बैठक - कोल्हापूरच्या अस्मितेचा प्रश्न असलेल्या आणि जिथे चित्रपटांचा पाया रचला गेला. अशा जयप्रभा स्टुडिओचे विक्री होऊ नये यासाठी यापूर्वीही मोठे आंदोलन उभे राहिले. या आंदोलनाला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने पाठिंबा दिला होता. मात्र, सर्वांनाच अंधारात ठेऊन पुन्हा ही जागा विक्रीची प्रक्रिया सुरू केली आणि 2020 मध्ये ज्यावेळी जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरू होता त्याच्या सुरुवातीलाच जागेची विक्री झाल्याचे समोर आले आहे. एकूण 6 कोटी 50 लाखांना कोल्हापुरातील जुना वाशी नका येथील एका भागीदारी फर्मने ही जागा विकत घेतली. ही बातमी आज (शनिवार) कोल्हापुरात वाऱ्यासारखी पसरली आणि सर्व स्तरातून याबाबतच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. दरम्यान, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळानेही तातडीने बैठक आयोजित करत यावर चर्चा केली व कोणत्याही परिस्थितीत ही जागा आम्ही सोडणार नाही म्हणत उद्या सकाळी दहा वाजल्यापासून जयप्रभा स्टुडिओ समोर साखळी उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली. कोल्हापूरकरांना आणि कलाकारांना त्यांच्या हक्काचे जयप्रभा स्टुडिओ पुन्हा सुरू होणार नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच राहील, असे महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
जागा खरेदी केलेल्या फर्मने पाठवले महामंडळास पत्र - दरम्यान, ही बैठक सुरू असताना ही जागा खरेदी केलेले श्री महालक्ष्मी स्टुडिओ एलएलपी फर्मने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळास पत्र पाठवले ते वाचून दाखवण्यात आले. या पत्रामध्ये लिहिले होते की, कोल्हापूर शहरातील जयप्रभा स्टुडीओची जागा ही मिळकतीची खरेदी जागेच्या मूळ मालक के. लता मंगेशकर यांच्याकडून श्री महालक्ष्मी स्टुडीओज एल.एल.पी. तर्फे कायदेशीररीत्या करण्यात आली आहे. मिळकतीमध्ये वास्तु, मोकळी जागा असा परिसर असून या जागेवर असणाऱ्या दोन इमारतीचा समावेश महानगरपालिकेने तयार केलेल्या हरीटेज वास्तूच्या यादीत केला असल्याचे समजते. याबाबत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिलेल्या सुचनेनुसार सदर ऐतिहासिक वास्तुस कोणत्याही प्रकारचा धोका उत्पन्न होईल, असे कोणतेही कृत्य फर्म मार्फत करण्यात आलेले नाही. जर कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने आम्हास शासकीय नियमाप्रमाणे सदर जागेच्या मोबदल्यास इतरत्र पर्यायी जागा दिल्यास आम्ही स्टुडीओची जागा कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनास हस्तांतरित करण्यास सहमत आहोत असे पत्रात म्हंटले आहे. तर राजेश क्षीरसागर यांनी या विषयाशी निगडीत अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, प्रजासत्ताक सामाजिक संस्था आणि कोल्हापूर जिल्हा कृती समिती यांच्यासोबत चर्चा करण्यात आली असून, त्यांचीही यास सहमती आहे, असेही यात म्हटले आहे. मात्र, राजेश क्षीरसागर यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाशी कोणतीही चर्चा केली नाही, असे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी स्पष्ट केलेले आहे.
हेही वाचा - Jay Prabha Studio Kolhapur : कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओची 2 वर्षापूर्वीच विक्री झाल्याचे उघड