कोल्हापूर Ajit Pawar statement on PHD : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानाविरोधात राज्यभरातील संशोधक विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. कोल्हापुरातील सारथी संशोधक विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाबाहेर अजित पवारांच्या विरोधात निदर्शनं करत त्यांचा निषेध केला आहे. जर संशोधक काही दिवे लावणार नसतील तर, मग अजित पवार राज्यात भावी मुख्यमंत्री होऊन काय दिवे लावणार, त्यांनी कशासाठी बंडखोरी केली यांचं उत्तर द्यायला हवं, अशा भावना संशोधक विद्यार्थी व्यक्त करत आहेत. 'आम्ही संशोधन पणत्या, दिवे लावण्यासाठी करत नाही, कमी शिकलेल्यांनी उच्च शिक्षणाबद्दल केलेलं वक्तव्य धक्कादायक' असल्याचं संशोधक विद्यार्थिनी पूजा चौगुल यांनी म्हटंल आहे.
विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पवारांकडून काम : संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळावी या मागणीसाठी कोल्हापुरातील सारथी उपकेंद्राबाहेर गेल्या 43 दिवसापासून विद्यार्थ्यांचं बेमुदत उपोषण सुरू आहे. मात्र, राज्य सरकारनं या उपोषणाची कोणतीही दखल घेतली नाही. कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सारथी शिष्टमंडळाची बैठक घेण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, निवेदन करूनही विद्यार्थ्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. मराठा उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांनी विद्यार्थ्यांची उपोषण स्थळी भेट घेतली होती. मात्र, गेली 43 दिवस बेमुदत उपोषण सुरू असताना संशोधक विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळालेला नाही. त्यात आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संशोधक विद्यार्थ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करून विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याची प्रतिक्रिया कोल्हापुरातील संशोधक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
17 डिसेंबरची सीईटी परीक्षा रद्द करा : राज्यभरातील संशोधक विद्यार्थ्यांची संख्या 1 हजार 329 आहे. त्यातच 17 डिसेंबर रोजी सीईटी परीक्षा होणार आहे. तसंच याच दिवशी राज्य लोकसेवा आयोग, युजीसी नेट परीक्षा, केंद्र सरकारच्या विविध विभागातील परीक्षा होणार आहेत. त्यामुळं संशोधक विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे. याचा राज्य सरकारनं विचार करावा, सीईटी परीक्षा स्थगित करावी, अशी मागणीही या विद्यार्थ्यांनी केली आहे.
राज्यभरातील संशोधक विद्यार्थी एकवटणार : राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी संशोधक विद्यार्थ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता राज्यभर उमटणार आहेत. राज्यातील सारथी कृती समिती, विविध विद्यापीठांमध्ये संशोधन करणारे विद्यार्थी या विरोधात आता आक्रमक होण्याची शक्यता आहे. यामुळं अजित पवारांनी संशोधक विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी आता विद्यार्थी करू लागले आहेत.
हेही वाचा -