कोल्हापूर - पूरग्रस्तांच्या घरबांधणासाठी आणखी मदत मिळण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी सांगितले. त्यांनी जिल्ह्यातील आंबेवाडी आणि चिखली येथील पूरग्रस्त गावांना भेट दिली. शासन सर्व स्तरांवर पूरग्रस्तांना मदत करत असून, शेवटच्या व्यक्तिपर्यंत मदतकार्य पोहोचवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी विविध स्तरांतून मदतीचा हात मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरबांधणीसाठी १ लाख रूपयांची मदत जाहीर केली. परंतू ही मदत तोकडी असल्याने स्थानिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
याउलट, कर्नाटक सरकारने पूरग्रस्तांना घर बांधणीसाठी 5 लाख रुपये तसेच पडझड झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी 1 लाख रुपये तत्काळ जाहीर केले असून, पुनर्वसन कार्यक्रमांतर्गत सरकारी खर्चाने घरे बांधून देणार असल्याचे कर्नाटक सरकारने जाहीर केले आहे.
याबाबत विचारले असता, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले. तसेच नुकसान भरपाई, कर्जमाफी असे अनेक विषय शासन स्तरावर सोडवले जात असून, सध्या सर्वांचे जीव वाचवणे ही सरकारची प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले.