कोल्हापूर- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा झपाट्याने वाढत आहे. कोल्हापुरातदेखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान विभागाची आणि जयसिंगपूरातील घोडावत विद्यापीठाची एक इमारत जम्बो सेंटरसाठी पुन्हा ताब्यात घेणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
हेही वाचा - सचिन वाझेची बाईक घेतली ताब्यात; एनआयएची कारवाई
पुन्हा जम्बो कोविड सेंटरची उभारणी
कोल्हापुरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. फेब्रुवारी महिन्यात कोरोना बाधितांची संख्या २२ वर गेली होती. या वाढत्या कोरोनावर आळा घालण्यासाठी नागरिकांना शासनाने लागू केलेल्या कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे पाटील म्हणाले. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची वाढणारी संख्या पाहता पुन्हा एकदा जम्बो कोविड सेंटर उभारण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. त्यासाठी पुन्हा शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाची इमारत, जयसिंगपूरमधील संजय घोडवत विद्यापीठाची एक इमारत व गडहिंग्लजमधील रुग्णलायची इमारत पुन्हा एकदा ताब्यात घेऊन, त्याठिकाणी कोविड केअर सेंटर उभारले जाणार असल्याचे सतेज पाटील म्हणाले.
हेही वाचा - महाराष्ट्रात कठोर निर्बंध; शनिवार-रविवारी कडक लॉकडाऊन, कॅबिनेट बैठकीत निर्णय