कोल्हापूर - गडिंग्लज तालुक्यातील यूरोलॉजिस्ट डॉ. प्रकाश गुणे यांनी भारतीय सैन्य दलाला तब्बल 1 कोटींची मदत दिली आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे त्यांनी हा धनादेश सुपूर्द केला आहे. राजनाथसिंह यांनीही याबाबत ट्विटरद्वारे कोल्हापुरातील डॉ. गुणे व त्यांच्या कुटुंबियांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
गुणे कुटुंबियांची चौथी पिढी वैद्यकीय सेवेत
कुटुंबियांची चौथी पिढी वैद्यकीय सेवेत आहे. मिळालेल्या उत्पन्नातील काही वाटा समाजसेवेसाठी, मदतीसाठी दिला पाहिजे ही भावना ठेवून त्यांनी सैन्य दालाच्या मदतीसाठी ते पुढे आले असून तब्बल 1 कोटींची मदत त्यांनी दिली आहे. 13 ऑगस्टला दिल्ली येथे जाऊन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे त्यांनी या मदतीचा धनादेश सुपूर्द केला. राजनाथ सिंह यांनीही आनंद व्यक्त करत गुणे कुटुंबियांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशासाठी लढतात; त्यांच्यासाठी खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न
देशाच्या संरक्षणासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता, जीव मुठीत घेऊन तसेच रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून देशाचे जवान सीमेवर पहारा देत असतात. अशावेळी युद्धात किंवा चकमकीत अनेक जवानांना वीरगती येते. त्यांच्यासाठी जे करावे ते कमीच आहे. त्यामुळे देशासाठी हुतात्मा होणाऱ्या भारतीय सैनिकांच्यासाठी मदत म्हणून खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला असल्याच्या भावना डॉ. गुणे यांनी व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा - कोल्हापुरात 'हे' खपवून घेणार नाही, भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना दम