कोल्हापूर - बेळगावहून मुंबईला चाललेले वायुसेनेच्या एमआय 8 या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तांत्रिक बिघाड झाल्याने हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. ( Emergency Helicopter Landing Kolhapur ) विशेष म्हणजे या हेलिकॉप्टरमध्ये वायुसेनेचे 9 अधिकारीसुद्धा होते. यशस्वीपणे लँडिंग झाल्याने मोठी दुर्घटना टळली. कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया यांनी ही माहिती दिली.
दोन ते अडीच तासांनी पुन्हा टेक ऑफ -
बेळगावहुन मुंबईला निघालेल्या वायुसेनेच्या एमआय 8 या हेलिकॉप्टर मध्ये बिघाड झाल्याची माहिती कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया यांना मिळाली. त्यानंतर तत्काळ इमर्जन्सी लँडिंगबाबतचे संदेश देण्यात आले. त्यानुसार योग्य ती यंत्रणा लावण्यात आली तसेच अग्निशमनला सुद्धा बोलविण्यात आले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हे हेलिकॉप्टर उतरविण्यात आले.
हेही वाचा - Jharkhand Bus Accident : पाकुडमध्ये बस गँस सिलेंडर ट्रकचा भीषण अपघात; 10 जणांचा मृत्यू
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेला काही दिवस उलटत नाही, तोपर्यंत कोल्हापूरातही वायूसेनेचे हेलिकॉप्टर उतरविण्यात आल्याने एकच खळबळ माजली. मात्र, यशस्वीपणे लँडिंग झाल्याने मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर तब्बल दोन तासांनी वायुसेनेच्या टेक्निशयनने बिघाड दुरुस्त केला आणि त्यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हेलिकॉप्टरने टेकऑफ केले.