कोल्हापूर - जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मृत्यूंची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढतच आहे. यातच कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची अर्थात गोकुळ दूध संघाची निवडणूक पार पडत आहे आणि यामध्येच धक्कादायक बाब म्हणजे जवळपास 40 ठराव धारकांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रचार यंत्रणा आणि उमेदवारांनी आता धास्ती घेतल्याचे बोलल्या जात आहे. दरम्यान, कोरोनामुळे आत्तापर्यंत 2 ठराव धारकांचा मृत्यूही झाला आहे.
न्यायालायच्या आदेशाने निवडणूक प्रक्रिया सुरू
वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, कोल्हापुरातील गोकुळची निवडणुक होत आहे. याला गोकुळच्या सत्ताधारी गटाने आक्षेप नोंदवत न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने आदेश देऊन निवडणूक प्रक्रिया पार पाडावी असे म्हटले होते. त्यानुसारच आतापर्यंतची निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये आता ठरावधारक कोरोनाबाधित आढळत आहेत. आत्तापर्यंत दोघांचा मृत्यूही झाला आहे. त्यातच जवळपास 40 जण पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ माजली आहे. शिवाय आज (मंगळवारी) न्यायालयात या निवडणुकीबाबत सुनावणी सुद्धा होणार होती. त्यामुळे आता निवडणूकीचे काय होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.