कोल्हापूर - कोविड केअर केंद्रात सुविधा मिळतात नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी सेंटरच्या इमारतीवर दगडफेक केली. चिंताजनक बाब म्हणजे ३५ पॉझिटिव्ह रुग्णांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. हा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरमध्ये घडला. या प्रकारामुळे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याच शहरात रुग्णांचे हाल होत असल्याची चर्चा रंगली आहे.
पिण्याचे पाणी, जेवण वेळेवर मिळत नाही, स्वच्छतागृहात पाणी नाही, वीज नाही, रूग्णालयाला खिडक्या नाहीत, अशा अनेक गैरसोयींचा पाढा कोराना रूग्णांनी वाचला. 'सुविधा मिळत नसल्यामुळे येथे मरण्यापेक्षा आम्ही घरात जावून मरतो', अशी भावना रूग्णांनी आंदोलनावेळी व्यक्त केली. वारंवार पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, असे सांगून सुद्धा लक्ष दिले जात नाही. आमच्यासोबत लहान मुले आहेत. त्यांनी मरावे का? अशी तक्रार एक महिलेने केली. उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर काळे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी घटनास्थळी धाव घेवून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, पोलिसांनी नातेवाईकांनी दगडफेक केल्याचे नाकारले आहे.
आज सकाळी नगराध्यक्षा डॉ. निता माने यांनी तहसिलदार अपर्णा मोरे यांची भेट घेवून मंगळवारी रात्री घडलेल्या घटनेची माहिती दिली. जयसिंगपूर येथे सुविधा देता येत नसतील तर त्यांना उदगावातील कुंजवन येथे दाखल करावे, अशी मागणी माने यांनी केली.