कोल्हापूर - महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कुरुंदवाड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून 23 दुचाकींसह एकूण 8 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विजय सतीश कांबळे (रा. लोकूर, कर्नाटक) असे या चोरट्याने नाव आहे. त्याच्याकडे आणखी चोरीच्या गुन्ह्यांबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती इचलकरंजीचे पोलीस उपअधीक्षक बी. बी. महामुनी यांनी दिली.
24 जानेवारीला सकाळी शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी येथून राजू मडीवाळ या दूध गवळ्याची दुचाकी चोरीस गेली होती. दूध विक्रेता मडीवाळ रतीबाचे दुध देण्यासाठी गेल्यानंतर चोरटा विजय कांबळे त्यांची गाडी चोरून नेत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसले होते. त्यावरून गणेशवाडीतील युवकांनीच चोरट्याचा शोध घेत लोकूर येथून पकडून आणले आणि कुरुंदवाड पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या पथकाने तपास केल्यानंतर आरोपी विजय कांबळेकडून 23 मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या.
आणखी काही गुन्हे होऊ शकतात उघड -
संबंधित चोरट्यांकडून माहिती घेतल्यानंतर 23 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्याच्याकडून आणखी चोरी उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यानुसार कुरुंदवाड पोलीस सुद्धा तपास करत आहेत असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, संशयित विजय कांबळे सोबत मोटार सायकलची विक्री करणारा फरार असून आणखी काहीजण सापडण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक बी. बी. महामुनी यांनी दिली.