कोल्हापूर : लहान वयात घरची जबाबदारी अंगावर पडली की, धडधाकट लोकांनाही घर चालवताना घाम फुटतो. मात्र कोल्हापुरातील दहावीत शिकणारा तसेच एका हाताने अपंग असणारा मुलगा मात्र वडिलांचे निधन झाल्याने, आपल्यावर पडलेली आईची जबाबदारी चिकन 65 विकून पूर्ण करत आहे. प्रसन्न तपकिरे असे या मुलाचे नाव आहे. जबाबदारीचे ओझे अंगावर पडल्यावर आयुष्य कसे जगायचे हे रोज तो त्या गाड्यावर दाखवून देतो.
तीन वर्षापूर्वी वडिलांचे निधन : कोल्हापुरातल्या फुलेवाडी परिसरात कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर एक छोटीशी चिकन 65 ची गाडी मनोज तपकिरे चालवत होते. त्यांच्या हाताच्या चवीमुळे येथे चिकन खण्यासाठी मोठी गर्दी व्हायची. त्यांचा छोटासा संसार सुखाने चालला होता. मात्र काळाने घाला घातला. मनोज तपकिरे यांचे तीन वर्षापूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे असलेले पत्नी अश्विनी आणि अपंग असलेला प्रसन्न यांचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरू झाला. सर्व कुटुंबाची जबाबदारी ही त्यांची पत्नी अश्विनी यांच्यावर आली. इतक्यात कोरोनामुळे लॉकडाऊन पडले, यामुळे गाडा देखील बंद करावा लागला. त्यांनी घरातूनच चिकन 65 बनवून पार्सल विकले. तसेच कोरोनानंतर त्यांनी स्वयंपाकाची कामे घेण्यास सुरूवात केली तसेच मेसचे देखील डबे द्यायला सुरुवात केली.
म्हणून घेतला गाड्यावर थांबण्याचा निर्णय : कोरोना काळानंतर आता सर्व परिस्थिती पूर्वीप्रमाणे झाली असल्यामुळे त्यांनी त्यांचा चिकनचा गाडा पुन्हा सुरू करण्याचे ठरवले. यामध्ये सर्वात मोठा निर्णय त्यांचा मुलगा प्रसन्नने घेतला. चिकन 65 चा गाडा म्हणजे अनेक प्रकारचे लोक येथे खाण्यासाठी येत असतात. अशावेळी आपल्या आईने त्या ठिकाणी थांबू नये यासाठीच प्रसन्नने स्वतः गाड्यावर थांबण्याचा निर्णय घेतला. प्रसन्न डाव्या हाताने कोणतेही काम करू शकत नाही. मात्र तरीही तो जिद्दीने शिक्षण घेत आहे. असे असून देखील त्याने गाडा सुरू केला. गाड्यावरील सर्व कामे तो एका सर्वसामान्य मुलाप्रमाणेच करतो.
अभ्यास आणि चिकनचा गाडा: प्रसन्न रोज त्याच्या वडिलांच्याच नावाने सुरू असलेला मनोज चिकन 65 हा गाडा सायंकाळी सहानंतर सुरु करतात. मात्र त्याची सर्व तयारी दुपारपासूनच सुरू असते. प्रसन्नची आई दुपारीच सर्व तयारी करून ठेवते. संध्याकाळी सहा वाजता प्रसन्न गाड्यावर येऊन साफसफाई करतो. घरातूनच मॅरिनेट करून आणलेले चिकन 65 तो स्वतः तळून ग्राहकाला देतो. या सर्वामध्ये त्याचा एक हात काम करत नाही, याची उणीव तो स्वतःला भासू देत नाही. मात्र तरी देखील त्याला मदतीसाठी त्याची आई रात्री आठपर्यंत गाड्यावर थांबते. तर त्यापुढे गाडा बंद करेपर्यंत प्रसन्नचे काका देखील थांबतात. गाड्यावर काम करताना तो पूर्ण लक्ष व्यवसायात देतो तर सकाळी शाळेत दहावीच्या ज्यादा तासाला देखील जातो. दिवसभर अभ्यास आणि संध्याकाळी सहानंतर चिकनचा गाडा चालवत आपल्या आईला सांभाळतो. इथे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला प्रसन्नचे कष्ट तर दिसतातच. मात्र त्याच्याकडे मिळणारे चिकन 65 हे चवीला उत्तम असल्यामुळे ग्राहक पुन्हा पुन्हा इथे येतात. शिवाय इतक्या लहान वयात त्याच्याकडून त्याचे कष्ट पाहता शिकण्यासारखे बरच काही आहे असे प्रत्येकाला वाटते.
हेही वाचा -