जालना - पाणी भरणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी एका 35 वर्षीय युवकाला दोन वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 6 जानेवारी 2014 ला ही घटना घडली होती. रमेश लक्ष्मण घोरपडे असे त्या आरोपी युवकाचे नाव आहे.
पाणी भरताना घडलेली घटना
सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नवीन जालना भागातील एक पीडित अल्पवयीन मुलगी नळाला पाणी न आल्यामुळे बाबुराव काळे चौकातील मंमादेवी ढाब्याजवळ पाणी भरण्यासाठी गेली होती. त्याच वेळी या प्रकरणातील आरोपी रमेश लक्ष्मण घोरपडे हा नळावर आला आणि नळावर पाणी भरत असलेल्या इतर लोकांना तेथून काढून दिले आणि या मुलीची छेड काढली. तसेच धमकी देत नळापासून बाजूला नेले आणि 'तू काय को हंडा लेके जाती' असे म्हणत तिची परत छेड काढली.
दरम्यानच्या काळात या पीडितेची मैत्रीण तिथे आल्यामुळे आरोपी रमेश घोरपडे याने या पीडित अल्पवयीन मुलीला सोडून दिले. घडलेला प्रकार मुलीने घरी आल्यानंतर तिच्या आईला सांगितला. त्याच दिवशी सदर बाजार पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
न्यायालयाचा निकाल
6 जानेवारी 2014 रोजी घडलेल्या घटनेचा आज, 5 फेब्रुवारी 2021 रोजी तब्बल सात वर्षानंतर निकाल लागला आहे. न्यायमूर्ती स.गो. देशमुख यांनी या खटल्याचा निकाल देताना पाच साक्षीदार तपासले. यामध्ये पीडित मुलगी, तिची आई, घटनास्थळाचा पंच, शाळेचे मुख्याध्यापक व तपासी अंमलदार एस.जी. जंगले यांची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती देशमुख यांनी आरोपी रमेश लक्ष्मण घोरपडे (वय 35 वर्षे राहणार कन्हैय्या नगर, जालना) याला दोन वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारच्यावतीने सहाय्यक सरकारी वकील वर्षा लक्ष्मीकांत मुकिम यांनी बाजू मांडली.