जालना - गेल्या ८ दिवसांपासून जालना शहरात बसस्थानकासमोर असलेल्या लोहार मोहल्ल्यामध्ये रोहित उर्फ सोन्या नारायण जाधव (वय 17) या गुन्हेगारामुळे वाद धुमसत होता. या वादाचे पर्यावसन रात्री या मुलाचा खून करण्यात झाले. याप्रकरणी मयताची आई संगिता नारायण जाधव (वय 40) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये वीस जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापैकी ८ पुरुष आणि २ महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी, या मागणीसाठी जाधव यांच्या नातेवाईकांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या या जाधव परिवारात आणि लोहार मोहल्ल्यातील रहिवाशांमध्ये सहा जूनला वाद झाला होता. या वादानंतर इथे राहणाऱ्या तान्ह्या जाधव सोन्या उर्फ रोहित जाधव आणि भुट्ट्या उर्फ आकाश जाधव या ३ भावांविरुद्ध पोलीस सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे या कुटुंबाने पलायन केले होते. त्यानंतर येथील जमावाने जाधव परिवाराचे घर पाडून तिथे नासधूस केली होती. त्यामुळे इथे चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.
रविवारी 9 जूनला रात्री साडेसात वाजता सोन्या उर्फ रोहित जाधव हा कुंडलिका नदीतून आपले पाडलेले घर पाहण्यासाठी येत असताना जमावाने नदीपात्रात सोन्याला गाठून बेदम मारहाण केली. अशा परिस्थितीत त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान अर्ध्या तासातच सोन्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सोन्याची आई संगीता नारायण जाधव यांनी आज सकाळी ७ वाजता सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. या तक्रारीमध्ये सोन्याला जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी लोखंडी पाईप, लाठ्या काठ्यांनी मारहाण करून त्याचा नदीपात्रातील मुरशादाबाद दर्ग्याजवळ खून करण्यात आला. यामध्ये माजिद, अजीज, मोहसीन, बशीर खान खत्री खान पठाण, शेख मासूम शेख करीम, शेख रसूल शेख युनूस, शेख रहीम शेख रईस, यांच्यासह २० जणांचा यामध्ये समावेश आहे.