जालना - कर्नाटकातील हिजाब वादाचे पडसाद आता जालन्यात ही उमटले आहे. जालन्यात गुरुवारी (दि. 10 फेब्रुवारी) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिजाब समर्थक मुस्लिम महिलांनी धरणे आंदोलन कर्नाटकात झालेल्या हिजाब वादाचा निषेध केला आहे. घटनेने सर्व नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र दिले आहे, त्यानुसारच आम्ही किंवा आमच्या मुली हिजाबचा वापर करतात, अशी प्रतिक्रिया आंदोलक महिलांकडून देण्यात आली. यावेळी 'पहले हिजाब, फिर किताब' यासह कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाही यावेळी उपस्थित महिलांकडून देण्यात आल्या.
काय प्रकरण ? - मंगळवारी उडुपी जिल्ह्यातील मणिपाल येथील महात्मा गांधी मेमोरियल कॉलेजमध्ये भगवी शाल घातलेले विद्यार्थी आणि हिजाब घातलेल्या विद्यार्थिनींच्या दोन गटांनी एकमेकांच्या विरोधात घोषणा दिल्याने तणाव वाढला. मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घालून कॉलेज किंवा क्लासेसमध्ये जाण्याची परवानगी नाही. तर हिजाबला प्रत्युत्तर म्हणून भगवी शाल परिधान केलेले हिंदू विद्यार्थी शैक्षणिक संस्थांमध्ये आले. जानेवारीमध्ये उडुपी येथील सरकारी महाविद्यालयात या प्रकरणाची सुरुवात झाली होती.