जालना - भोकरदन तालुक्यातील मौजे आव्हाना गावाजवळील घारेवाडी येथील शेतात काही दिवसांपूर्वी एका अनोळखी महिलेचा मृतदेह कुजलेला अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. यानंतर भोकरदन पोलिसांनी या गुन्ह्याची नोंद घेवून तपास सुरू केला. पोलिसांनी या गुन्ह्याचा अंतिम छडा लावला असून अनैतिक संबंधातून या महिलेची हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी गुन्हेगारास अटक केली आहे.
हेही वाचा... अक्कलकोटला निघालेल्या भरधाव चारचाकीची ट्रकला धडक; मुंबईचे तीन ठार
भोकरदन पोलिसांनी केलेल्या तपासात या महिलेचे नाव व माहिती समोर आली. ही महिला पंचिफुला करताडे (रा सिल्लोड) येथील असल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. यानंतर मृत महिलेच्या मुलाने तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली.
हेही वाचा... खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी, मृताविरोधातच गुन्हा दाखल झाल्याचा धक्कादायक प्रकार
पोलिसांनी आपल्या सुत्रांमार्फत आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळवली असता, त्या महिलेचा खून घारेवाडी येथील कृष्णा घारे या व्यक्तीने केला असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून विचारपूस केली असता, आरोपीने आपला गुन्ह्याची कबुली दिली. महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवल्यानंतर आरोपीने महिलेसोबत लग्नाला नकार दिला. यानंतर तिने सातत्याने लग्नाचा तकादा लावला होता. यानंतर कृष्णा याने महिलेला 10 नोव्हेंबरला फोन करून त्याच्या शेतात बोलवून घेतले. यावेळी त्याने पुन्हा तिच्यासोबत शारिरिक संबंध प्रस्तापित केले. यावेळी तिने पुन्हा लग्नाबाबत विचारणा केली असता, त्याने तिच्याच साडीने गळा आवळून तिचा खून केला. तसेच तिचे प्रेत लपविण्यासाठी आणि पुरावा नाहीसा करण्यासाठी रामदास गावंडे यांच्या शेतामध्ये ते लपवून ठेवले. पोलिसांनी आरोपीजवळ चौकशी केल्यानंतर आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. भोकरदनचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुनिल जायभाये, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी व त्यांच्या टिमने या गुन्ह्याच्या तपासाची कामगिरी पार पाडली.
हेही वाचा... रायगडमध्ये तिहेरी तलाकचा गुन्हा दाखल