जालना - शस्त्र विक्रीसाठी आलेल्या सहा आरोपींसोबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची झटापट झाली. या प्रकरणात पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून त्यात एका राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाचादेखील समावेश आहे. आरोपींकडून 2 गावठी पिस्तूल, एक खंजीर आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.
ठाणे शहरातील गुन्हेगारांचा जालन्यात शोध घेत असताना स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. गुप्त माहितीच्या आधारावर त्यांनी बस स्थानक परिसरात असलेल्या त्रिवेनी लॉजवर लक्ष ठेवले. त्यानंतर शनिवारी दुपारी दोन वाजता सहाही आरोपी या लॉजवर जमले. त्यामधील तीन व्यक्तींनी त्रिवेनी लॉजची खोली नंबर 202 मध्ये प्रवेश केला. त्याच वेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा, आरोपींनी पोलिसांवर पिस्तूल रोखले आणि गोळी मारण्याची धमकी दिली. पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह यांनीदेखील त्यांच्या सर्विस पिस्तूलमधून आरोपीवर नेम धरला. यावेळी पोलीस हेडकॉन्स्टेबल कांबळे यांच्यावर एका आरोपीने धारदार खंजीराने हल्ला केला. आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता लॉजच्या खाली थांबलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपींना ताब्यात घेतले. लॉज बाहेर असलेले तिघे पळून गेले असता या आरोपींनाही पोलिसांनी पाठलाग करून त्याब्यात घेतले.
श्रीकांत ताडेपकर (वय 32), रवी कांबळे (वय 40), सुशांत भुरे( वय 20) विशाल कीर्तीशाही (वय 39), अमरसिंग सूर्यवंशी (वय 36) आणि एसआरपीएफ जवान सुजित श्रीसुंदर (वय 28) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल, एक धारदार खंजीरसह एकूण 3 लाख 88 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक चैतन्य अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलीस संदीप सावळे, पोलीस उपनिरीक्षक शेख रज्जाक, कांबळे, वैराळ आदी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.