जालना - पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी आमदार आदर्श गाव दत्तक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नंदापूर गाव दत्तक घेतले आहे. त्यामधील महत्त्वाच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत गावाला ४७ लाख रुपये निधी मिळाला आहे. मात्र, अद्यापही ग्रामस्थांना प्यायला पाणी मिळाले नाही. त्यामुळे ग्रामस्थांना आजही ४ रुपयाला हंडा याप्रमाणे पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.
जालना शहरापासून १० किलोमीटर अंतरावर सिंदखेड राजाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नंदापूर गाव वसले आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे अडीच हजाराच्या जवळपास आहे. सरपंच म्हणून दत्तात्रय चव्हाण, तर ग्रामसेवक म्हणून एम. ए. वझरकर या गावचा गाडा हाकत आहेत. आदर्श गाव दत्तक योजनेत गाव असल्यामुळे सुमारे ७ कोटींचा निधी मिळाला आहे. त्यामध्ये 47 लाख रुपये पाणीपुरवठा योजना, ६ लाख रुपये मातीच्या रस्त्यााठी, १० लाख सभामंडप, ३ लाख सिमेंट रस्ता, ३ लाख दलित वस्ती पाणीपुरवठा योजना, ५ लाख सिमेंट रस्ता, परत ३ लाख रुपये सिमेंट रस्त्यासाठी, १३ लाख रुपये जलयुक्त शिवारसाठी आणि 72 लाख रुपये सिमेंट बंधारा, त्यासोबत नंदापूर-अंभोरे, वाडी, कडवंची या गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी देखील ४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. याप्रकारे सुमारे ७ कोटी रुपयांचा निधीही या गावाच्या विकासासाठी मिळाला आहे. येथे शिवसेनेची एक हाती सत्ता असतानादेखील केवळ पाणीपुरवठा योजनेचे आलेले ४७ लाख रुपये गुत्तेदार यांच्या वाटाघाटीवरून आणि प्रतिष्ठेच्या प्रश्नावरून ग्रामस्थांच्या घरापर्यंत एक थेंबही पाणी पोहोचलेले नाही. प्रत्यक्षात या गावामध्ये ४७ लाख रुपये एवढ्या निधीमधून प्रत्येक घरासमोर नळ जाईल अशी व्यवस्था होऊ शकते. असे असतानाही आजही घरासमोर ५ फूट खोल नळाचे खड्डे पाहायला मिळतात.
पावसाळ्यात देखील गावात भीषण पाणीटंचाई आहे. त्यामुळे लहान मुलांना देखील पाण्यासाठी भटकंती करावी लागते. गावात शौचालय, सिमेंट रस्ते सभागृह आदी कामे झालेली आहे. मात्र, फक्त ग्रामस्थांना पाण्याअभावी तडफडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ग्रामस्थ प्रचंड संताप व्यक्त करीत आहेत. एकंदरीतच या गावाची परिस्थिती पाहिली तर 'गाव तसं चांगलं, मात्र पाण्याअभावी भंगलं' असे म्हणण्याची वेळ येते.
आठवीपर्यंत असणारी शाळा झाली सातवीपर्यंत -
अर्जुन खोतकर यांनी दत्तक घेतलेल्या गावात शिक्षणाचा दर्जा खालावत चालला आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना गावाजवळच सुरू झालेल्या शाळांमध्ये घातले आहेत. विशेष म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर हे अर्जुन खोतकर यांचे बंधू आहेत. असे असताना देखील गावात आठवीपर्यंत सुरू असलेली जिल्हा परिषदेची शाळा १ वर्ग घटून सातवीपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे गरिबांच्या मुलांनी शिकावे कसे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.