जालना- तालुक्यातील विरेगाव तांडा, या गावाला मुख्य रस्त्यापर्यंत जायला रस्ता नसल्याने गावकऱ्यांची गैरसोय होत आहे. रस्ता नसल्याने गावाचा विकास खुंटला आहे. गावकऱ्यांना रुग्णालयात जायला मार्ग नाही, तर शेतकऱ्यांना बी-बियाने आणणेही कठीन झाले आहे. परिणामी, संतापलेल्या ग्रामस्थांनी रस्ता न बांधल्यास संपूर्ण गाव तहसील कार्यालयातच बसवू, असा इशारा दिला आहे.
रस्ता नसल्याने विरेगाव तांड्यातील ग्रामस्थ ७२ वर्षांपासून नदीपात्रातून प्रवास करत आहे. हा प्रवास देखील त्यांच्यासाठी धोकादायक ठरत आहे. पात्रामध्ये एक मोठी विहीर आहे. पात्र भरून आल्याने विहीर दिसून येत नाही. त्यामुळे जीवीतहानी होण्याची शक्यता आहे. सध्या नदीत भरपूर पाणी आहे, त्यामुळे ग्रामस्थ नदीकाठच्या रस्त्यावरून ये-जा करीत आहे. मात्र, यामुळे शेतीला नुकसान होत असल्याने शेत मालक त्याला विरोध करत आहे. त्यामुळे, इकडे आड आणि तिकडे विहीर अशा द्विधा मनस्थितीत ग्रामस्थ सापडले आहेत.
रस्त्याअभावी गावातील मुलांचे शिक्षण देखील खुंटले आहे. सध्या लॉकडाऊन सुरू आहे. याआधी रस्ता नसल्याने शिक्षक नदीतून प्रवास करत शाळेत यायचे. मात्र, पाणी वाढले की त्यांना शाळेत येणे कठीण व्हायचे. परिणामी शाळा बंद ठेवावी लागायची. तसेच, गावातील तरुणांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरी भागात जावे लागते. मात्र, रस्ताच नसल्याने त्यांना देखील शिक्षणापासून मुकावे लागत आहे.
रस्ता नसल्याने शेतकऱ्यांनाही नुकसान होत आहे. बी-बियाणे आणण्यासाठी दळवळणाची साधनेच नाहीत. तसेच सणासुदीच्या दिवसांत किंवा कार्यक्रमात इतर गावातील नागरिक देखील गावात प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे, सामाजिक संप्रेषणावर परिणाम होत आहे. ग्रामस्थांना आपल्याच नातेवाईकांना भेटता येणे कठीण झाले आहे.
रस्ता नसल्याने गावातील नागरिक वैद्यकीय सेवेला देखील मुकत आहे. गावातील नागरिकांना गंभीर आजार झाल्यास, गर्भवती स्त्रियांना उपचार घेण्यासाठी शहरी भागात जायला रस्ताच नाही. परिणामी त्यांना उपचार मिळत नाही. एकंदरीत रस्ता नसल्याने संपूर्ण गावाचा कारभार विस्कटला आहे. हा त्रास अनेक वर्षांपासून ग्रामस्थ सहन करत आहे. त्यामुळे, महिन्याभरात रस्ताच्या प्रश्न सुटला नाही तर संपूर्ण गाव तहसील कार्यालयात येऊन बस्तान मांडेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
हेही वाचा- 'लैंगिक अत्याचाराचे गुन्हे असलेल्या आरोपींना जामीन देऊ नका'