जालना - नागरी वसाहतीसारखेच ग्रामीण भागातील प्रशासनही कोरोना रोगाविषयी जागृत झालेले आहे. बदनापूर तालुक्यातील विविध गावात औषध फवारणी करून निर्जंतुकीकरणाबरोबरच समाज जागृतीवर भर देण्यात येत आहे. तालुक्यातील उज्जैनपुरी येथेही शासनाच्या निर्देशानुसार औषधी फवारणी करून गाव रोगमुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना करत असल्याचे दिसून आले.
कोरोना रोगाचे सावट संपूर्ण देशभर असल्यामुळे संचारबंदी राबवण्यात येत आहे. ठिकठिकाणी निर्जंतुकीकरण व विविध उपाययोजना नागरी वसाहतीत राबवल्या जात आहेत. असे असतानाच बदनापूर तालुक्यातील ग्रामीण भागातही औषध फवारणी करुन गाव रोगमुक्त करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत प्रशासनही काम करत असल्याचे सुखद चित्र तालुक्यात आहे.
तालुक्यातील उज्जैनुपरी येथे सरपंच बी.टी. शिंदे यांनी मागील पंधरवाड्यापासून कोरोनामुक्त गाव ठेवण्यासाठी विविध उपाययोजना गावपातळीवर केलेल्या आहेत. त्यांनी आधी गावाच्या सीमा सीलबंद केल्या. तसेच बाहेरगावाहून आलेल्यांची वैद्यकीय तपासणी करूनच गावात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे ग्रामस्थांनाही कोरोना रोगाबाबत जनजागृती केली, शासनाने सुचवल्याप्रमाणे संपूर्ण गावात औषधी फवारणी केली. या गावाप्रमाणेच तालुक्यातील अनेक ठिकाणच्या ग्राम पंचायत खबरदारी घेत असल्याचे सुखद चित्र असून ग्रामीण भागातही कोरोनाबाबत मोठया प्रमाणात जागृती झाल्याचे दिसून येत आहे.