जालना- सध्या राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे वाहत आहे. ग्रामपंचायत निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मनसे पाठोपाठ आता वंचित बहुजन आघाडीने देखील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायत निवडणुकांसोबतच इतर पंचायत स्थरावरील सर्व निवडणुका लढवणार असल्याची माहिती वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी दिली आहे.
तरुणांना प्रशिक्षण
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी पक्षाने मोर्चेबांधनीला देखील सुरुवात केली असल्याचे विश्वकर्मा यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तरुणांनी राजकारणात यावे, आपल्या गावाचा, तालुक्याचा पर्याने जिल्ह्याचा विकास करावा, यासाठी वंचितच्या वतीने तरुण वर्गाला प्रशिक्षण देण्यात येत आहे. भविष्यात अशा तरुणांमधील राजकीय व सामाजिक कौशल्य बघून त्यांना योग्य ती जबाबदारी देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले आहेत. निवडणुकीसाठी पक्षाच्या वतीने सदस्य नोंदनी अभियानाला प्रारंभ करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
ऊर्जा मंत्र्यांवर निशाणा
दरम्यान यावेळी निलेश विश्वकर्मा यांनी वीजबिलाच्या मुद्द्यावरून नाव न घेता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर निशाना साधला आहे. आधी वीजबिलात सूट देण्याचे आश्वासन दिले, मात्र नंतर पलटी मारली अशी टीका त्यांनी यावेळी केली. नागरिकांना वीजबिलात सूट मिळावी यासाठी अनेकवेळा वंचितच्या वतीने आंदोलने करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातील 42 घरांची वीज प्रशासनाकडून तोडण्यात आली होती. ती आम्ही पुन्हा जोडून दिली. तसेच प्रत्येक जिल्ह्यात पक्षाच्या वतीने वीज बिलासंदर्भात तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. याचा फायदाही ग्राहकांनी घ्यावा असे आवाहान त्यांनी यावेळी केले.