जालना - बदनापूर तालुक्यात मागील चार वर्षांपासून सलग दुष्काळी परिस्थिती होती. अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. यंदाही खरीप हंगामात अत्यल्प पावसाने खरीप उत्पादन म्हणावे तसे झाले नव्हते. मात्र, त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 या महिन्यांत परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा निर्माण झाल्या होत्या. सिंचनाची सोय या पावसामुळे झाली होती. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी फळबागा तसेच रब्बीचे गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांची पेरणी केली होती. रब्बीचे पिकही जोमदार आले असतानाच मंगळवारी सायंकाळी प्रचंड गारपिटीमुळे या शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा... बापरे...! कोरोनामुळे बंदी असताना एसडीएफ शाळेने घेतली नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा
गहू, हरभरा व ज्वारी पिकांची सोंगणी व काढणी चालू असतानाच ही गारपीट झाल्यामुळे त्याचा प्रचंड फटका शेतकऱ्यांना बसला आहे. तर ज्या शेतकऱ्यांचा गहू शेतात उभा होता, तो गहूही खाली पडून मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात जवळपास 70 टक्के नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. तालुक्यातील वाल्हा, भराडखेडा, नांदखेडा, म्हसला, राळा, अन्वी, लोधेवाडी, अकोला, निकळक, सोमठाणा, मालेवाडी, साखरवाडी या गावातील परिस्थिती भयावह आहे. येथील उभ्या गव्हाची अवस्था अतिशय वाईट दिसून येत आहे. जवळपास अर्धा तास बोराच्या आकाराच्या तर काही ठिकाणी त्यापेक्षा मोठ्या गारा बसरल्या. या गारपिटीमुळे शेतपिकाचे प्रचंड नुकसान झालेले असतानाच वादळी वारा व गारपिटीमुळे अनेक ठिकाणी विद्युत रोहित्रे उडाल्याने वीजपुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे शासनाने त्वरित पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
हेही वाचा... पोलिसांकडून मौलानांना कोरोना विषयी जनजागृतीचे आवाहन; एकत्र जमण्यावर मात्र चुप्पी
बदनापूर तालुक्यातील लोढेवाडी येथील कैलास सुकलाल चंदेल या तरुण शेतकऱ्यांच्या शेतात पाहणी केली असता. त्यांचा 3 एकर गहू, 2 एकर उन्हाळी बाजरी व एक एकर टॉमेटो पिकाची प्रचंड नासाडी झालेली दिसून आली. गहू पूर्णपणे पडलेला होता, तर टॉमेटो रानात अस्ताव्यस्तपणे पडलेले आढळले. याबाबत चंदेल यांनी सांगितले की, 'मी खरीप हंगामात मका पिक घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु लष्करी अळीमुळे त्या हंगामात उत्पादन मिळाले नाही. परतीच्या पावसानंतर मी गहू, बाजरी व टॉमेटो लागवड उधार-उसनवारी करून केली होती. पिकही जोमदार आले होते. परंतु गारपिटीनंतर या पिकांची प्रचंड नासाडी झाली आहे' असे सांगताना या शेतकऱ्याच्या भावना अनावर झाल्याचे दिसून आले.
म्हसला येथील तरुण शेतकरी सचिन म्हसलेकर यांची दोन एकर द्राक्षे बाग आहे. या बागेत विक्रीसाठी तयार असलेले द्राक्षे होते. या आठवडयापासून द्राक्षे विक्री सुरू करण्याच्या विचारात असलेल्या म्हसलेकर यांच्या या बागेलाही गारपिटीचा प्रचंड फटका बसला आहे. तयार असलेले द्राक्षांचे घड या गारपिटीमुळे खाली पडल्याने विखुरले गेले. तसेच पावसाच्या व गारपिटीच्या फटक्याने सर्वांत मोठे नुकसान या द्राक्षाचे झाले आहे. या बाबत म्हसलेकर यांनी सांगितले की, 'ऑक्टोबर महिन्यात छाटणी केलेली असतानाही प्रचंड पावसाने या बागेचे नुकसान झाले होते. परंतु आम्ही मोठ्या हिंमतीने ही बाग जगवली होती. मात्र, आता या गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झाले' त्यामुळे आता उमेदच हरल्यासारखी परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.