जालना - दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या अपघातामध्ये दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. तर या अपघातामध्ये एक मुलगी देखील गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास भोकरदन जालना रस्त्यावरील गारखेडा पाटीजवळ घडला. विशाल कैलास साबळे (वय 20) रा.बरंजळा साबळे ता.भोकरदन व विशाल शिवाजी दळवी (वय 21) रा. येवता ता. जाफ्राबाद असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. तर वैष्णवी दगडुबा साबळे (वय 11) रा.बरंजळा साबळे ता.भोकरदन ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
दोघांचा घटनास्थळीच मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील बरंजळा साबळे येथील तरुण विशाल साबळे हा त्याची चुलत बहीण वैष्णवी हिच्यासोबत दुचाकीने काही कामानिमित्त गारखेडा देवी येथे जात असताना, गारखेडा पाटीजवळ अचानक समोरून येणारी दुचाकी त्यांच्या दुचाकीला धडकली. हा अपघात एवढा भिषण होता की, दोन्ही दुचाकीचालकांचा जागीच मृत्यू झाला, तर वैष्णवी साबळे ही अपघातामध्ये गंभीर जखमी झाली असून, तिला उपचारासाठी भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी औरंगाबादला हलवण्यात आले आहे. दरम्यान या घटनेने बरंजळा साबळे व येवता गावावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा - नाशिक येथे कारमध्ये ऑक्सिजन पुरवल्याने कोरोना रुग्णाचे वाचले प्राण