जालना - राज्यभरात रजा अकॅडमीने काढलेल्या मोर्चावरून (raza academy morcha jalna) राजकारण पेटले आहे. याच पार्श्वभूमीवर दोन समुदायांमध्ये नांदेड, अमरावतीत दंगे झाले. 12 नोव्हेंबरला जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर रझा अकॅडमीने मोर्चाचे आयोजन केले होते. अत्यंत शांततेत हा मोर्चा जालन्यात पार पडला. मात्र, जालन्यातील मोर्चा संपल्यानंतर या मोर्चातील मोर्चेकरी घरी परतत असताना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घाटी रुग्णालयाच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षातून संशयास्पद हालचाल करणाऱ्या दोघांना जालना पोलिसांनी तेव्हाच ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. (two people arrested by jalna police)
मोबाईल, खंजीर, रोख रक्कम जप्त -
जालन्यातील रहिवासी असलेला 30 वर्षीय स्वप्नील गुमरे आणि औरंगाबादमधील 26 वर्षीय संतोष पारवे अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे समोर आली आहे. दोघांपैकी पोलिसांनी गुमरे यांची झाडाझडती घेतलेली असताना त्यांच्या ताब्यातून 9 इंच लांबीचा खंजिर, मोबाईल आणि काही रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्हीही संशयित तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर कदीम जालना पोलिसांत गुन्हा दाखल केला. दरम्यान, या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती कदीम जालना पोलिसांनी दिली आहे.