जालना - भोकरदन तालुक्यात अवैधरित्या दारूची तस्करी करण्याचे प्रमाण वाढले आहे. या तस्करीविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. आन्वा ते शिवणा रस्त्यावरून अवैध देशी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघांना पारध पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 20 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शामराव साळूबा लोखंडे (रा. शिवणा ता. सिल्लोड जि. औरंगाबाद) आणि शेषराव संपत जाधव (आनवा ता. भोकरदन) अशी आरोपींची नावे आहेत.
या कारवाईची अधिकची माहिती अशी की, शनिवारी (16 नोव्हेंबर) आन्वा ते शिवणा रस्त्यावरून दुचाकीवरून अवैध देशी दारूची चोरटी वाहतूक करण्यात येणार असल्याची माहिती पारध पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आनवा मार्गावरील जुन्या बस स्थानकाच्या बाजूला सापळा रचून संशयित दुचाकी (MH 21,बी.जे.9354) अडवून तपासणी केली असता, दुचाकीवरील दोघांकडे देशी दारूच्या तब्बल 96 बाटल्या आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी मुद्देमाल जप्त करत दोघा आरोपींना अटक केली आहे.दरम्यान, या कडक कारवाईमुळे पारध परिसरातील अवैध धंदे कणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.