जालना- जिल्ह्यात ग्रामपंचयात निवडणुकीसाठी १५ तारखेला मतदान पार पडल्या. त्यानंतर सोमावारी मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जालना-औरंगाबाद महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. औरंगाबाद महामार्गावर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कार्यशाळेत मतमोजणी होणार आहे.
असा असेल बदल-
मतमोजणीला जालना तालुक्यातील ग्रामस्थांची गर्दी उसळण्याची शक्यता गृहीत धरली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर महामार्गावर वाहतुकीस अडथळा होऊ नये आणि अपघात होऊ नये, म्हणून पोलीस यंत्रणेने सोमवारी या मार्गावरील वाहतुकीत बदल केला आहे. औरंगाबाद हुन येणारी वाहतूक सनराईज हॉटेल पासून औद्योगिक वसाहतीमधून विकास बार या मार्गे वळविण्यात आली आहे. तसेच जाताना देखीलही वाहतूक विकास बार मार्गे सनराईज हॉटेल पासून मुख्य रस्त्याला लागेल. त्याचप्रमाणे जालना औरंगाबाद महामार्गावर दुहेरी वाहतूक बंद करून एकेरी वाहतूक सुरू ठेवली आहे. फक्त दुचाकी आणि कारला परवानगी देण्यात येणार आहे.
अकरा वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता-
सकाळी नऊ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. मात्र त्या तयारीला लागण्यासाठी कर्मचाऱ्यांना 7 वाजल्यापासूनच बोलावण्यात आले आहे. मतदान हे यंत्राद्वारे मोजण्यात येणार असल्यामुळे 11 वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे.
चोख पोलीस बंदोबस्त-
ग्रामपंचयात निवडणुकीच्या मतमोजनीसाठी तालुक्यातील मतदार या ठिकाणी येणार आहेत. तसेच गावातील गटबाजी निवडणुकीतील वादविवाद मतमोजणीवेळी निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात असणार आहे. उद्या दीडशे पोलीस अंमलदार आणि आठ अधिकारी या सर्व व परिस्थितीवर नियंत्रण ठेवणार आहेत.