जालना - वडिलोपार्जित घर अर्जदाराच्या नावावर करून देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. मंठा तालुक्यातील विडोळी बुद्रुक येथील हा ग्रामसेवक असून भाऊसाहेब बबन वाल्हेकर असे त्याचे नाव आहे.
या प्रकरणातील तक्रारदाराचे विडोळी बुद्रुक येथे वडिलोपार्जित घर आहे. हे घर तक्रारदाराच्या नावावर करून देण्यासाठी आणि ग्रामपंचायतीला नोंद घेण्यासाठी तक्रारदाराने वाल्हेकर यांच्याकडे अर्ज केला. त्यानुसार वाल्हेकर यांनी यासोबत बाँड पेपर जोडावा लागेल, असे म्हणून त्यांना परत पाठवले. 7 मे रोजी तक्रारदारांने बाँड पेपर घेऊन वाल्हेकर यांची भेट घेतली आणि नमुना नंबर 8 चा उतारा मागितला. त्यावेळी वाल्हेकर यांनी तक्रारदाराकडे चार हजार रुपयांची लाच मागितली. मात्र तक्रारदाराने "साहेब मी तुमच्या ग्रामपंचायत ग्रामपंचायत शिपाई आहे "असे म्हणून लाच देण्यासाठी नकार दिला. मात्र चार हजार रुपये आणि बाँड दोन्ही एकत्र मिळाले तरच काम होईल अन्यथा होणार नाही, असे सांगून वाल्हेकर यांनी तक्रारदाराला परत पाठवले.
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. या तक्रारीची बुधवारी पडताळणी केली असता तक्रारदाराने तडजोडीअंती तीन हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार अंबड येथे पाचोड चौफुली रोडवर तक्रारदाराकडून तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक भाऊसाहेब बबन वाल्हेकर याला रंगेहाथ पकडले .