जालना - चंदनझिरा पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री केलेल्या एका गावठी कट्टयासह तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या गावठी कट्ट्यामध्ये एक गोळी अडकलेली असल्याचे पोलिसांनी सांगितले. चंदनझिरा पोलिसांना खबऱ्यांमार्फत गुप्त माहिती मिळाली की, कन्हैया नगर भागामध्ये एक जण गावठी कट्टा घेऊन फिरत आहे. या माहितीच्या आधारे विशेष पथकाने पहाटे अडीच वाजेच्या सुमारास कन्हैया नगर भागात सापळा रचला.
पोलिसांनी आकाश रावसाहेब देवकर (वय 32, लालबाग जालना), मिलिंद माणिक गवई (वय 40, लालबाग जालना) आणि अंकुश तेजराव खंदारे (सातेफळ, तालुका जाफराबाद) या तिघांना ताब्यात घेतले. आरोपींकडून गावठी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र) जप्त केले आहे. बाजारात तीस हजार रुपये किंमत असलेले हे अग्निशस्त्र आकाश रावसाहेब देवकर याच्याकडे होते, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कोठाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, पोलीस कॉन्स्टेबल अनिल भाऊसाहेब काळे आदिंनी ही कारवाई केली. अनिल काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या पिस्टलची पाहणी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी केली आहे.